बेळगाव लाईव्ह : हिंदू पंचांगानुसार गुरुवार दि. २९ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त बेळगावमधील बाजारपेठेत उपवासासाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे.
हिंदू धर्मात या दिवसाला विशेष असे महत्व असून वारकरी संप्रदायासाठी मोठा उत्सव असणाऱ्या देवशयनी एकादशीनिमित्त उपवास केला जातो.
या उपवासासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत दाखल झाले असून बुधवारी सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केलेली पाहायला मिळाली.
साबुदाणा, वरई, शेंगदाणा, बटाटे, रताळी, खजूर यासह उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या साहित्यात काहीशी दरवाढ झाली असून उपवासाच्या साहित्यासह पूजेच्या साहित्याचीही खरेदी नागरिक करत आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त बेळगावमधील विविध विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून एकादशीचा सोहळा अधिकाधिक उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यासाठी देवस्थान समितीकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे.