सहा जूनला दरवर्षी नेमकेपणाने हजर होणारा मान्सून यावर्षी जूनची 18 तारीख ओलांडली तरी अजून बेळगावात दाखल झाला नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी नांगरून कुळवून आणि काही ठिकाणी धूळ वाफ पेरणी करून तयार असताना पाऊस मात्र दडी मारून बसला आहे.
ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बनली आहे. दरवर्षी नेमकेपणाने येणारा मान्सून लांबल्यामुळे एकंदर शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी तुफान झालेल्या पावसाने बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालं होतं. यावर्षी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या उरकून घेतल्या आहेत.
आधीच ओढवलेले महागाईचे सुलतानी संकट आणि त्याचबरोबर हे आस्मानी संकट शेतकऱ्याला मात्र गोत्यात आणू पाहत आहे. अनेक गोष्टीची दरवाढ झाल्याने अगोदरच शेतकरी नाडला जात असताना पावसाने ओढ दिल्याने सगळीच परिस्थिती गंभीरतेकडे झुकलेली आहे.
शेतकऱ्यांनी यंदाचा हंगाम व्यवस्थित होईल पाऊस व्यवस्थित येईल हा सरकारी अंदाज खरा मानून एकंदर पेरण्याची गडबड केली आणि शेतकरी गोत्यात आला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.हवामान खात्याने यावर्षी सरासरी एवढा पाऊस किंवा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस असा अंदाज वर्तवलेला असताना यंदा पावसाने दिलेली ही ओढ शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे.
या सर्व गोष्टीवर साकल्याने विचार करत प्रशासनाने शेतकऱ्याच्या पाठीशी ताकतीने उभे राहणे गरजेचे आहे. दुबार पेरणीचे संकट जर उद्भवले तर मोफत बियाणे पुरवणेही गरजेचे आहे.
काही ठिकाणी जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथं शेतकरी विहिरी नाल्याचे पाणी पुरवून पीक जगवण्याचा प्रयत्न करत आहेत .या सगळ्या गोष्टीचा विचार करून नागरिकांनी आणि प्रशासनाने शेतकऱ्यांना सहाय्य करणे गरजेचे बनले आहे.