कर्नाटक राज्य सरकारच्या सर्वसामान्य गरीब जनतेला 10 किलो मोफत तांदूळ देण्याच्या महत्त्वाकांशी “अन्यभाग्य” योजनेसाठी तांदूळ उपलब्ध करण्यास केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी नकार दिल्याच्या निषेधार्थ कर्नाटक काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार असिफ सेठ, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व काँग्रेसच्या अन्य नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली आज सोमवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चा दरम्यान केंद्र सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाच्या निषेधार्थ तसेच राज्य सरकारच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. मोर्चाच्या अग्रभागी हातात तांदळाच्या बुट्ट्या घेऊन निघालेल्या काँग्रेस महिला कार्यकर्त्या साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ आणि हातात काँग्रेसचा झेंडा व फलक घेऊन सहभागी झाले होते. मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले की आमच्या काँग्रेस सरकारने राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेला 10 किलो तांदूळ मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय अन्न महामंडळाने गेल्या 12 जून रोजी कर्नाटक सरकारला ठराविक दराने 15 लाख मॅट्रिक टन तांदूळ देण्याची तयारी लेखी पत्राद्वारे दर्शविली होती. मात्र केंद्र सरकारच्या दबावामुळे त्यांनी त्यानंतर 13 तारखेला आम्ही खुल्या बाजारात तांदळाची विक्री करणार असल्यामुळे तुम्हाला तांदूळ देता येणार नाही असे कळविले आहे. हा कोणता सबका साथ, सबका विकास आहे? केंद्राकडून कोणतीही साथ नाही आणि विश्वासही नाही. हा फक्त अंदानी -अंबानी सारख्या उद्योगपतींचा विकास आहे. आज आम्ही गरिबांना 10 किलो तांदूळ मोफत देत आहोत हे न पाहवल्यामुळे तांदळाचे वितरण रोखण्यात आले आहे असे सांगून यावर उपाय शोधण्यासाठी सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांची चर्चा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत कोठूनही तांदूळ खरेदी करून आम्ही आमची योजना निश्चितपणे राबवणार आहोत, असे आमदार सेठ यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारची अन्नभाग्य योजना महिला आणि बालकल्याण खात्यामार्फत राबविली जाणार आहे. या खात्याच्या मंत्री बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी राज्यातील काँग्रेस सरकारची महत्त्वपूर्ण आणि जनहितार्थ अन्नभाग्य योजनेअंतर्गत बीपीएल व एपीएल कार्डधारकांना 10 किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले. सदर योजना येत्या 1 जुलैपासून सुरू होणार आहे.
त्यासाठी गेल्या 12 तारखेला आमच्या सरकारने केंद्र सरकारच्या भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) पत्र पाठवून 2 लाख 50 हजार मेट्रिक टन तांदळाची मागणी केली होती. त्यावेळी एफसीआयच्या व्यवस्थापकीय संचालकांनी आमची मागणी मान्य करून आम्हाला तसे लेखी कळविले होते. त्यानंतर 13 तारखेला केंद्र सरकारने आम्ही 15 लाख मेट्रिक टन तांदूळ खुल्या बाजारात उपलब्ध करणार आहोत. त्यामुळे कर्नाटक सरकारला आम्ही 2 लाख 50 हजार मेट्रिक टन तांदूळ देऊ शकत नसल्याचे कळविले आहे. जे केंद्र सरकार एकीकडे आपण गोरगरिबांचा कैवारी असल्याचे सांगते, मोदीजी सारखे मन की बात, मन की बात म्हणत असतात त्यांच्याकडून हे घडले आहे मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे. ज्यावेळी कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले आणि त्यांनी जनहितार्थ अन्नभाग्य सारखी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. त्या योजनेसाठी त्यांनी तांदूळ दिला नाही आणि म्हणूनच याच्या आम्ही आज मोर्चा काढून निषेध नोंदवला आहे.
आज राज्यभरात जिल्हास्तरावर हे आंदोलन झाले आहे. यानंतर ते तालुकास्तरावर देखील केले जाईल. केंद्राला माझा एक संदेश आहे तुम्ही जे सांगतात ते करत नाही. तेंव्हा किमान दुसरे करतात त्यांना करू द्या असे सांगून आम्ही कोठूनही तांदूळ उपलब्ध करण्याद्वारे कोणत्याही परिस्थितीत येत्या 1 जुलैपासून आमची अन्नभाग्य योजना अंमलात आणू, असा विश्वासही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला.