बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जनतेला काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाच गॅरंटी योजनेतील काही योजनांवर पहिल्या टप्प्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारने घेतला असून प्रस्तुत आर्थिक वर्षामध्ये त्या सगळ्या पाचही गॅरंटी योजना लागू करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज स्पष्ट केले.
५ गॅरंटी योजनांपैकी महिलांना मोफत बसप्रवास देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यानुसार येत्या ११ जून पासून राज्यातील सर्व महिलांना मोफत बसप्रवास करता येणे शक्य आहे. मात्र एसी / राजहंस / स्लीपर बस वगळता अन्य सरकारी बस मध्ये एकंदरीत कर्नाटक राज्यात महिलांना मोफत बस प्रवास हा मोफत राहणार आहे.
केएसआरटीसी बसमध्ये पुरुषांना ५०% जागा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. शुक्रवार दि. २ जून रोजी बोलाविण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी हि घोषणा केली आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली असून याच आर्थिक वर्षामध्ये पाचही गॅरंटी योजना लागू करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाचही गॅरंटी योजना लागू करण्याचा निर्धार या आधीच झाला होता. यापैकी गृह ज्योती योजना जुलै महिन्यापासून लागू होणार आहे. गृह लक्ष्मी लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे लाभार्थी महिलांनी जमा करणे गरजेचे आहे. घरच्या प्रमुख महिलेच्या बँक खात्यात मासिक २०००/- रुपये जमा करण्यात येतील . जून १५ ते जुलै पर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करता येतो. १५ ऑगस्ट नंतर लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होईल. एपीएल आणि बीपीएल दोन्ही कार्डधारक महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
अन्नभाग्य योजनेंतर्गत काँग्रेसची सत्ताकाळात ७ किलो तांदूळ देण्यात येत होते, भाजप सरकारने त्यात २ किलो कपात केली होती. मात्र जुलै १ पासून बीपीएल आणि एपीएल कार्डधारकांना आता १० किलो धान्य वितरित करण्यात येणार आहे. युवानिधी योजनेंतर्गत २०२२-२३ सालच्या पदवी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील २४ महिन्या करीता रुपये ३०००, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रुपये १५०० नोकरी लागेपर्यंत देण्यात येणार आहे. तसेच हि योजना तृतीय पंथियांना देखील लागू होणार आहेत.