शिष्य : गुरुजी, जवळपास दोन महिने झाले आपण बोललो नाही…!
गुरुजी : वत्सा, महाराष्ट्र एकीकरण समिती आणि एकंदर बेळगावातील मराठी माणूस, त्याच्या मानसिकतेचा आणि पराभवाचे मी विश्लेषण करत होतो. आणि त्यातून जी बाब पुढे आली, त्याबद्दल मला तुला काहीतरी बोलायचे आहे.
शिष्य : गुरुजी इतके दिवस का गप्प होता? आधीच विश्लेषण करायचं होतं..
गुरुजी : मराठी माणूस अनेक भागात विखुरलेला आहे. ही त्याच्यामागची कारणे आहेत. काही मराठी माणसांनी जीव तोडून काम केले. आणि काही मराठी माणसे स्वार्थासाठी विकली गेली. या दोघांची विश्लेषणे करायची होती. कोण विकलंय आणि कुणी प्रामाणिकपणे काम केलंय? हे सर्व खोलवर शिरून शोधायचं होतं ,यासाठी मी थोडा वेळ घेतला आता तुला सगळ्या बाबी टप्प्याटप्प्याने सांगत जाईन.
शिष्य : या सगळ्या गोष्टी आता एकदाच सांगणार कि? यासाठीही वेळ घेणार?
गुरुजी : प्रत्येक मतदारसंघाचे वेगळे विश्लेषण सांगेन.
शिष्य : गुरुजी, ग्रामीणमध्ये काय झालं? ग्रामीणमध्ये नामुष्कीजनक आणि मानहानिजनक परिस्थिती कशी झाली मराठी माणसाची?
गुरुजी : ग्रामीणची जखम खूप खोलवरची आहे. पूर्वीच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान काही रकमा घेऊन मराठी माणसांनीच सत्ताधारी पक्षाचा प्रचार केला. ही जखम माकडाच्या जखमेत बोट घालून ताजी करावी तशी यावेळी ह्या माणसांनी केली. त्यात काही लोक अस्तीनीतील निखारे निघाले! पूर्व भागातील एका नेत्याने समितीला मते पडू नयेत खबरदारी घेत आपली चाल रचली. त्याचा शोध आणि विश्लेषण करणं गरजेचं आहे. वत्सा, ज्यावेळी आपल्याच आस्तीनीत निखारे असतात त्यावेळी जगाशी लढताना खूप अडचणी येतात. आपल्या क्षमतेला खूप मर्यादा पडतात. याचा जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळी एक गोष्ट लक्षात घे. पूर्व भागातील आपली मते का गेली? याचा पहिल्यांदा विचार करावा लागेल. जो उमेदवार होता त्याच्याच घरातील एकाने दगाबाजी केली. आणि ती दगाबाजी समितीला घातक ठरली.
शिष्य : त्या दगाबाजाने चोराच्या उलट्या बोंबा सुरु केल्या?
गुरुजी : पत्रकारांनाच नोटिसी पाठवायचा प्रकार केला. पत्रकार जर त्याच्या मागे लागले आणि त्याच्या सगळ्या कुलंगड्या बाहेर काढल्या तर त्याला तोंड दाखविणे मुश्किल होईल. आणि या अशा वृत्तीला आपण थांबवत नाही त्यामुळे असे प्रकार वारंवार होतात. समितीच्या नेत्यांनी नव्हे तर कार्यकर्त्यांनी जाऊन त्याला जाब विचारणे गरजेचे आहे. त्याचे लागेबांधे कुठं जोडले गेले आहेत हे शोधून काढणे गरजेचे आहे.
शिष्य : गुरुजी, तालुक्यातील लोक निवडणुकीच्या आधी कुठे कुठे गेले होते? काही नेते दक्षिणेतही व्यवहार करण्यासाठी आले होते.. हे नेमके काय प्रकरण आहे?
गुरुजी : सुतगट्टी घाटातील प्रकरण आता झाकून राहिलेलं नाही. हे प्रकरण आता गावाला माहीत झालेलं आहे. ते सगळ्यांना माहित आहे. हे असे व्यवहार करणारे सीमा भागात सगळीकडे व्यवहार झाल्यामुळे बिकाउ लोकांनी हि निवडणूक हरवली असं म्हणता येईल. त्याच बरोबर कराड मध्ये पिकलेला शंभूचा बेळगावात अर्ध भक्कलचं कसे पोहोचले याची मात्र चर्चा मराठी माणसात जोरदार पणे चालू आहे.चारी उमेदवारांच्या हातात अकरा अकरा तांदळाचे दाणे ठेवण्यात आले पोती कुठं गेली याची चविष्ट चर्चा सर्वत्र सुरू आहे.
शिष्य : मग एकंदर मराठी माणसाचे पानिपत झाले असे म्हणता येईल का?
गुरुजी : नाही, नाही.. तसं म्हणता येणार नाही. मराठी माणसाचं पानिपत नव्हे तर मराठी नेत्याच्या वृत्तीचं पानिपत झालं. कारण मराठी माणसाने अजून प्रश्नाशी बांधिलकी सोडली नाही. आज दक्षिणेत ६५००० मते त्या कांताला पडली. मराठी माणूस एकजुटीने त्याच्या पाठीशी उभा राहिला.
शिष्य : हे झालंच.. पण ग्रामीण मधील काही महाभाग दक्षिणेत का आले होते?
गुरुजी : हे कायम व्यवहार करणारे लोक आहेत. त्यांनी आतापर्यंत समितीच्या माध्यमातून व्यवहार केले आहेत. हे मराठीचे पाईक नव्हेत. मराठीच्या नावाखाली पैशासाठी समितीत आलेले लोक आहेत. यांच्या चालीरीती मराठी माणसांनी समजून घेतल्या पाहिजे. जे मागील पोटनिवडणुकीत घडलं तसाच व्यवहार या निवडणुकीत घडला. या माध्यमातून सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत, हे समजून घेतले पाहिजे. मी स्वाभिमानी आहे, आत्माभिमानी आहे, पुरोगामी आहे, हे सर्व खोटं आहे. हे सर्वजण चोर आहेत. हे समजून घेतले पाहिजे. समितीच्या एकंदर रचनेत मराठी माणूस केंद्रस्थानी आहे. हे मात्र नक्की आहे. मराठी माणूस नेहमीच आपल्या हक्कांसाठी भांडत आलेला आहे. त्या मराठी माणसालाच एक योग्य नेतृत्व मिळण्याची गरज आहे.
शिष्य : गुरुजी मग सध्या आहेत ती नेतृत्व बाद झाली आहेत का?
गुरुजी : नेतृत्व नव्हे तर वृत्ती बाद झाल्या आहेत. हि वृत्ती सुधारण्याची गरज आहे. हि वृत्ती जर सुधारली नाही तोपर्यंत मराठी माणसाचे हित येत नाही.
शिष्य : साडे चार वर्षानंतर आता एक नेता बाहेर येत आहे. त्याचं काय गुरुजी?
गुरुजी : ती तर वृत्ती संपल्यात जमा आहे. ती व्यक्ती महाराष्ट्र, गोव्यात जाऊन पक्षाच्या व्यासपीठावर टाळ्या वाजवत उभा राहते हे सर्व जगाने बघितले आहे. त्याचा सीमाभागात आल्यानंतरच मुखवटा आणि इतर ठिकाणचा मुखवटा वेगळा आहे. त्याचे हितसंबंध आता कोणत्या राष्ट्रीय पक्षाशी जोडलेले आहेत हे लपून राहिलेले नाही. त्या राष्ट्रीय पक्षाचे हीत जपण्यासाठी तो काम करत आहे, हेही सगळ्यांना माहित आहे. त्याचबरोबर जो मराठी माणूस सीमाभागात ताकदवान होतो, त्या माणसाला आपल्या पंखाखाली घ्यायचं. युज अँड थ्रो प्रमाणे वापर करायचा. अशी त्याची वृत्ती आहे. हि वृत्ती लोकांनी ओळखली पाहिजे. ती विशिष्ट वर्गाची नीती समजून घेतली पाहिजे. आणि त्या माणसाला कसं खड्यासारखं बाजूला करायचं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे.
शिष्य: पराभवच विश्लेषण इतकंच की अजून आहे?
गुरुजी :अजून खूप आहे, कसे काय काय आहे वेळ येईल तसे तसे तुला सांगत जाईन….