बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित ‘वंदे भारत’ या सुपरफास्ट रेल्वेसेवेचा आज विविध पाच ठिकाणाहून लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. यादरम्यान कर्नाटकातील धारवाडमधून हुबळीसाठी वंदे भारत रेल्वे धावली. यावेळी कर्नाटकातील धारवाड मधून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदे भारत रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी वंदे भारत योजना लवकरच बेळगावपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
प्रल्हाद जोशी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनंतर बेळगावकरांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र वंदे भारत प्रमाणे बेळगाव विमानतळावरून बंद झालेल्या विमानफेऱ्या पूर्ववत करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी बेळगावकरांतून होत आहे. बेळगावच्या अनेक विमान सेवा मंत्री जोशी यांनी हुबळीला स्थलांतरित केल्या असा आरोप होत आहे त्या पार्श्वभूमीवर वंदे भारत बद्दल जोशी यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
धारवाड – कित्तूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यांनतर बेळगावपर्यंत वंदे भारत सेवा सुरु करण्यात येईल, असे आश्वासनही जोशी त्यांनी दिले. मात्र या आश्वासनांनंतर प्रल्हाद जोशी यांना बेळगावमधील नेटकरी ट्रोल करत आहेत.
बेळगावमधील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेळगावचा विकास खुंटला आहे. बेळगावचे अनेक प्रकल्प हुबळी-धारवाड ला वळविण्यात येत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून याविरोधात बेळगावकर आवाज उठवत असून आज वंदे भारत रेल्वेसेवेच्या शुभारंभानंतर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
बेळगावमधील महत्वपूर्ण प्रकल्प हुबळी-धारवाडला वळविण्यात आले आहेत. याच धर्तीवर अव्वल क्रमांकावर असणाऱ्या बेळगाव विमानतळावरून विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत तर अनेक विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
यामुळे बेळगावहून विविध ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे वंदे भारतसह बेळगावच्या विमानसेवेकडे प्रामुख्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी बेळगावकरांनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे.