शहराच्या आसपासची गावे बेळगाव महानगरपालिका कार्यक्षेत्रात विलीन करून लोकसंख्येच्या आधारे शहरातील प्रभागांची पुनर्रचना करण्याचा जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा प्रस्ताव आहे. या कृतीमुळे सध्याच्या 58 प्रभागांमध्ये वाढ होऊन ते जवळपास 90 प्रभाग होणार असून शहर महापालिकेचे नव्याने “बृहन बेळगाव महानगरपालिका” (बीबीएमपी) असे नामकरण होऊ शकते. ज्यामुळे ती अधिकाधिक विकास निधीसाठी पात्र ठरू शकते. जर असे घडले तर बेंगलोर नंतर बीबीएमपी दर्जा मिळवणारे बेळगाव हे राज्यातील दुसरे शहर ठरणार आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वीच बेळगाव ग्रामीण मतदार संघातील हिंडलगा, हलगा, बस्तवाड, मोदगा, सांबरा, पिरनवाडी, मच्छे आणि धामणे ही गावे तसेच आपल्या यमकनमर्डी मतदारसंघातील काकती, होनगा व बेन्नाळी या गावांचा महापालिका कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील प्रस्ताव नगर विकास मंत्रालयासमोर सादर करण्यात आला असून मंत्र्यांनी बृहन बेळगावच्या योजनेवर काम करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केली आहे. बृहन बेळगाव योजना प्रत्यक्षात उतरल्यास शहराचा लक्षणीय विकास तर होणारच आहे, याखेरीस आसपासच्या गावांचा अंतर्भाव झाल्यामुळे विकासाचा लाभ व्यापक लोकसंख्येला मिळणार आहे. तसेच प्रभागांची संख्या वाढणार असल्यामुळे लोकांना चांगले प्रतिनिधित्व मिळणार आहे. बृहन दर्जा मिळाल्यामुळे महापालिकेला अधिकाधिक विकास निधी मिळेल. ज्यामुळे अधिकाधिक विकास प्रकल्प राबवता येणार आहेत. स्वतः मंत्री जारकीहोळी यांनी बेळगावला जर बीबीएमपी दर्जा मिळाला तर शहर विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होईल असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, विकासाबरोबरच नव्या परिसराची निकड असताना गेल्या सुमारे 30 वर्षात बेळगाव मधील सर्व प्रभागांची पुनर्रचना झालेली नाही. गेल्या 1985 मध्ये बेळगाव शहरात 52 प्रभागांसह नगरपालिका होती. मात्र पुढे 1991 मध्ये शहरातील प्रभागांच्या संख्येत सुधारणा करत ते 58 इतके वाढवण्यात आले आणि नगरपालिकेचा दर्जा वाढवून तिला बेळगाव महानगरपालिकेचा दर्जा देण्यात आला. सध्याची लोकसंख्या लक्षात घेता शहरात 75 प्रभाग हवेत. सध्या अस्तित्वात असलेल्या प्रभागांमध्ये मुळ 25 ते 30 हजार इतक्या सरासरी लोकसंख्येपेक्षा 4 ते 5 पटीने अधिक लोकसंख्या आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची संख्या निश्चित करावयाची झाल्यास ती 75 प्रभाग अशी वाढवावी लागणार आहे आणि जर यामध्ये शेजारील ग्रामीण परिसराचा समावेश झाल्यास ही संख्या जवळपास 90 पर्यंत पोहोचणार आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी बेळगावला बीबीएमपी दर्जा मिळावा यासाठी कंबर कसली आहे. ज्यामुळे शहराला अधिक विकास निधी उपलब्ध होणार आहे.