बेळगाव शहर परिसरात आज गुरुवारी आषाढी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्यात येत असून ठीक ठिकाणच्या श्री विठ्ठल मंदिरांमध्ये देवदर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची एकच गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.
आषाढी एकादशी निमित्त खडेबाजार बेळगाव येथील पुरातन श्री विठ्ठल मंदिरामध्ये आज पहाटे अभिषेक आणि विशेष पूजाविधी पार पडले. त्यानंतर भल्या सकाळपासून या मंदिरात श्री विठ्ठल -रखुमाई दर्शनासाठी स्त्री-पुरुष भाविकांची रीघ लागली होती. बेळगाव लाईव्हशी बोलताना मंदिराचे पुरोहितांनी सदर मंदिर विठ्ठल टेंगशे यांच्या मालकीचे असून सुमारे 300 वर्षांपूर्वीच्या या मंदिरात तेंव्हापासून आजतागायत आषाढी आणि कार्तिकी एकादशी भक्तीभावाने साजरी करण्याची परंपरा कायम आहे.
यानिमित्ताने दरवर्षी लाख -दीड लाख भाविक या मंदिराला भेट देऊन पूजाअर्चा करण्यासह देवदर्शन घेतात. त्याचप्रमाणे कांही कारणास्तव पंढरपूरला न जाऊ शकलेली या भागातील भक्तमंडळी या ठिकाणी येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात, अशी माहिती दिली.
या विठ्ठल मंदिराप्रमाणे वडगाव येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये देखील आज सकाळपासून देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. मोठ्या संख्येने श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेणाऱ्या स्त्री-पुरुष अबालावृद्ध भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप केले जात होते. यासंदर्भात माहिती देताना मंदिर व्यवस्थापन समितीच्या एका सदस्याने आषाढी एकादशी निमित्त आज सकाळी सर्वप्रथम पंचाभिषेक व इतर अभिषेक पार पडले.
दरवर्षी आषाढी एकादशी दिवशी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे श्री विठ्ठल मंदिर देवदर्शनासाठी खुले ठेवले जाते. या कालावधीत विष्णुसहस्त्रनाम, भजन व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दिवसभर देवदर्शनासाठी गर्दी करणाऱ्या भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप केले जाते. प्रसादामध्ये खिचडी, केळी, लाडू आदींचा समावेश असतो, असे सांगितले.
खडेबाजार आणि वडगाव येथील या श्री विठ्ठल मंदिराप्रमाणे शहर परिसरातील ठिकठिकाणी मंदिरांमध्ये आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती. प्रत्येक मंदिरांमध्ये देवदर्शनानंतर भाविक भक्तिभावाने तीर्थप्रसादाचा लाभ घेताना दिसत होते.