Friday, December 20, 2024

/

स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी बहुविध भूमिका निभावणाऱ्या : एनिड जॉन

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : स्वप्नं प्रत्येकाला पडतात. स्वप्नं प्रत्येकजण पाहतात. अनेकजण स्वप्न दिवसा उजेडात पाहतात. आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ध्येयवेड्या भावनेने आपला मार्ग ठरवतात. लहानपणी पाहिलेले स्वप्न प्रत्येकाचेच सत्यात उतरते असे नाही. आपण पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत, कष्ट, जिद्द आणि चिकाटीची आवश्यकता असते. लहानपणीपासून स्वप्न पाहून मोठेपणी त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी अशाच जिद्दीने, चिकाटीने बहुविध भूमिका पार पाडत नावारूपास आलेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नी म्हणजेच एनिड जॉन!

मूळच्या बेळगाव येथील शिवाजीनगर येथे जन्मलेल्या एनिड जॉन यांनी आपले शालेय शिक्षण सेंट झेवियर्स मधून तर महाविद्यालयीन शिक्षण लिंगराज महाविद्यालयातून केले आहे. आपल्या अंगी असलेल्या नानाविध कलाकृतींच्या माध्यमातून यशाचे शिखर गाठले आहे. दुसऱ्या महायुद्धात आजोबांचा असलेला सहभाग आणि त्यानंतर त्यांच्याच गोष्टी ऐकत भारतीय सैन्यदलाबद्दल असलेले आकर्षण आणि आदर जोपासत त्यांचा विवाह देखील गणेशपूर स्थित, ब्रिगेडियर निव्ह जॉन एसएम यांच्याशी झाला आणि इथून पुढे त्यांचे आयुष्य लष्करी जीवनशैलीशी जोडले गेले.

एनिड जॉन या वीर नारी(फौजी पत्नी), एक आई, एक बहुविध प्रतिभा असलेली स्त्री, आणि एक महत्त्वाकांक्षी मॉडेल म्हणून परिचित आहेत. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करत धैर्याने आणि एकाग्रतेने त्यांनी आपल्या आयुष्यातील विविध पैलू यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवले आहेत. एका स्त्रीने चार भिंतींच्या आत आपले अस्तित्व मर्यादित न ठेवता आपल्यासह आपल्या आजूबाजूच्या परिसराचा देखील कायापालट करावा, आपल्यातील कला जिवंत ठेवावी अशी त्यांची मतं आहेत.

एनिड जॉन या एक उत्तम बेकर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची केक बनवायची विशेष शैली हि देशभर प्रसिद्ध आहे. ‘एनीड्स मॅजिक बॅटर’ या नावाखाली त्या स्वतःची उत्तम दर्जाची, अद्वितीय अशी संस्था चालवत आहेत. लष्करी जवानांच्या कुटुंबियांशी जोडले गेल्याने त्यांना अनेकवेळा बदलीमुळे विविध ठिकाणी जाऊन वास्तव्य करावे लागले. यादरम्यान त्यांनी मध्यप्रदेश येथील महू मधून आपल्या केक बनविण्याच्या कलेची सुरुवात केली. केकसह विविध प्रकारचे ड्रिंक्स आणि पुडिंग मध्येही त्यांची स्पेशालिटी आहे. याचप्रमाणे केक बनविण्यासाठी त्या अजिबात अंडी किंवा जिलेटीनचा वापर करत नाहीत. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या कलेचा आवाका गुजराथ, राजस्थान, पंजाब यासारख्या अनेक ठिकाणी पसरला आहे.

आपली कला इतर महिलांनाही शिकवावी या हेतूने लष्करी जवानांच्या कुटुंबियातील महिलांना केकचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. ऑनलाईन प्लॅटफॉर्म सह लष्करी जवानांच्या कुटुंबियांमधील महिलांसाठी त्या विशेष प्रशिक्षण वर्ग घेतात. इतरांपेक्षा संपूर्णपणे वेगळे असणारे, विविध प्रकारचे केक बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे. आजवर त्यांनी ६.५ फूट उंचीचा मोठा केक बनवला असून त्यांच्या या कलेची नोंद घेत त्यांना २०२२-२३ या सालच्या ‘सिल्व्हर स्पून’ पुरस्काराने तसेच ‘शायनिंग सिल्व्हर स्पून’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आजवर त्यांनी सुमारे ४००० हुन अधिक लष्करी जवानांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना केक बनविण्याचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या केक बनविण्याच्या कलाकुसरीत त्यांनी आयएनएस विक्रमादित्य, नेव्ही डे यासारखे अनेक महत्वपूर्ण आणि लक्षवेधी असणारे शेकडो थीम बेस्ड केक तयार केले आहेत.

फौजी पत्नी, उत्तम बेकर, ब्युटी एक्स्पर्ट आणि उत्तम मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या एनिड जॉन यांनी अलीकडेच दिल्ली येथे झालेल्या मिसेस इंडिया डायडेम लेगसी या स्पर्धेत रॅम्पवॉक करत प्रथम उपविजेत्यापदाचा मान पटकाविला. या स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आयुष्यातील विविध भूमिका पार पाडत असतानाच आपले लहानपणीचे स्वप्न देखील पूर्ण करावे अशी आपली इच्छा होती. मला मॉडेल व्हायचे होते आणि या स्वप्नासाठी मी खूप मेहनत घेतल्याचे त्या सांगतात.John elide

शिक्षक, समुपदेशक, ब्युटी स्पेशलिस्ट ते टॉप केक आर्टिस्ट बनण्यापर्यंत आपण अनेक व्यवसाय स्वीकारले. प्रत्येक भूमिकेने आपल्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू दाखवला, आणि यामुळे आपल्या व्यक्तिरेखेची नवीन खोली आणि जीवनाबद्दलची उत्कटता मिळत गेली असेही त्या सांगतात. आयुष्यात आपल्याला आपले व्यक्तिमत्व न्याहाळून पाहायचे असेल तर बांधिलकी, एकाग्रता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याची इच्छा आवश्यक आहे. आपल्यातील सुप्त कलागुणांना मूर्त रूप देत, धैर्याने प्रत्येक पाऊल पुढे टाकत प्रत्येक महिलेने यशाची वाट धरावी असेही त्या सांगतात.

बेळगावचा डंका संपूर्ण देशात – परदेशात आहे. आपल्याच देशात राहून अशा विविधांगी कलागुणांना वाव देत आयुष्याकडे सकारात्मक पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन देणाऱ्या एनिड जॉन यांनी कमावलेले नाव आणि प्रतिष्ठा बेळगावच्या शिरपेचात नक्कीच मनाचा तुरा रोवल्याप्रमाणे आहे! त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.