भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) तीन दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार देशातील सर्व बँकांमध्ये आज मंगळवारपासून 2000 रुपयांच्या नोटा बदलून मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्याकडील 2 हजाराच्या नोटा बँकेत बदलून घेऊ शकणार आहेत किंवा येत्या 30 सप्टेंबरपर्यंत आपल्या खात्यावर जमा करू शकणार आहेत.
भारतीय रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार 2000 रुपयांच्या नोटांचे लीगल टेंडर 30 सप्टेंबर नंतर देखील कायम असणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना एकावेळी 20,000 रुपये किमतीच्या 2 हजाराच्या फक्त 10 नोटा बदलून घेता येतील. मात्र या नोटा आपल्या खात्यावर जमा करण्यास कोणतीही मर्यादा नसणार आहे.
दरम्यान, आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल सोमवारी नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये 2000 च्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया मंगळवार 23 मे पासून सुरू होत असून नोटा बदलण्यासाठी 4 महिन्यांचा दीर्घ कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये निष्कारण गर्दी करू नये, असा सल्ला दिला आहे.
रिझर्व बँक नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत संवेदनशील आहे आणि गरज पडल्यास नियमावली तयार करेल. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सोयीसाठी बँकांना उन्हापासून संरक्षण, पिण्याच्या पाण्याची सुविधा वगैरे आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बँक खात्यांमध्ये 50,000 रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम जमा करण्यासाठी पॅन सादर करणे बंधनकारक आहे.
हा नियम 2000 रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यासाठीही लागू असेल. अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशा प्रमाणात अन्य चलनांच्या मुद्रीत नोटा उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांना काळजी करण्याचे कारण नाही, असेही आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले.