बेळगाव लाईव्ह : आपल्या आजूबाजूला दररोज अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. या घटनांची तक्रार करण्यासाठी सजग नागरिक पोलीस स्थानकात धाव घेतात. मात्र कित्येकदा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते. यावरून अनेकवेळा वादावादीचे प्रसंग देखील घडतात. बऱ्याचवेळा फिर्याददार पोलीस स्थानकाच्या फेऱ्या मारतो, ताटकळतो, पोलिसांच्या उडवाउडवीच्या उत्तरांना वैतागतो.
आणि शेवटी पदरी निराशा घेऊन माघारी फिरतो, असे प्रसंग अनेकवेळा घडले आहेत. मात्र प्रत्येक घटनेबाबत पोलीस स्थानक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबत जनतेचे गैरसमजदेखील होतात. पोलिसांबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावना दूर करण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
एखादी व्यक्ती तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात आल्यावर अर्ध्या तासात पोलिसांनी त्यांची दखल न घेतल्यास संबंधितांनी थेट पोलिस मुख्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पोलीस प्रमुखांनी केले आहे. तसेच, जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस मुख्यालयाचा संपर्क क्रमांक भित्तिपत्रकावर चिकटविण्यात आला आहे. कौटुंबिक कलह, चोरी, यासह इतर प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या फिर्यादींबरोबर पोलिस असभ्य वर्तणूक करतात. त्यांची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करतात.
तसेच, फिर्याददारांनाच आरोपीची वागणूक दिली जाते. उडवाउडवीची उत्तरे देत किंवा कारणे सांगत फिर्याददारांना तासनतास पोलिस ठाण्यात ताटकळत ठेवले जाते.
मात्र, यात बदल करण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी पुढाकार घेत पोलीस विभागासंदर्भात असलेले चित्र पालटण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.