बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील १८ मतदार संघांपैकी ११ मतदार संघात काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले असून यामध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
या गोष्टी लक्षात घेत सतीश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले असून आज झालेल्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान इतर ७ आमदारांसह सतीश जारकीहोळींनी देखील शपथ घेतली.
बेळगाव जिल्ह्यात कोणाचीही सत्ता असो वर्चस्व मात्र जारकीहोळी बंधुंचेच राहते हे आजवर सिद्ध झाले असून कर्नाटक विधानसभा निवडणुकीत किंगमेकर ठरलेल्या सतीश जारकीहोळी यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल करण्यात आले आहे. कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाज असून विधानसभा निवडणुकीत या समाजाची मते मिळवण्यात काँग्रेसचे राज्य कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यशस्वी झाले आहेत. त्यांनी राज्यात वाल्मिकी समाज आणि इतर अनुसूचित जमातींचे संघटन करून काँग्रेस पक्षाला मोठा पाठिंबा मिळवून दिला. तसेच बेळगाव जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे पक्ष मानतो.
सतीश जारकीहोळी पूर्वी दोन वेळा निधर्मी जनता दलाकडून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांनी २००६ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर २००८ पासून ते सलग चौथ्यांदा यमकनमर्डी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. अत्यंत साध्या राहणीमानाच्या आमदार सतीश जारकीहोळी यांचा काँग्रेस पक्षात मोठा दबदबा आहे. या वेळच्या निवडणुकीत ते चौथ्यांदा निवडून आल्यामुळे त्यांना महत्त्वाचे मंत्रिपद मिळणार हे निश्चित झाले होते. एखाद्या कुटुंबातील दोन व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यास त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. याला जारकीहोळी बंधू मात्र अपवाद ठरले आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी स्वबळावर निवडून आले आहेत. त्यांचे कनिष्ठ बंधू लखन जारकीहोळी हे यापूर्वीच अपक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. जारकीहोळी बंधूंचा बेळगाव जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे हे विशेष ! गोकाक, यमकनमर्डी, आरभावी या मतदारसंघांसोबत बेळगाव ग्रामीण, अथणी, कागवाड, निपाणी, बेळगाव ग्रामीण या मतदारसंघावरही त्यांचा प्रभाव आहे.
बंगळूर येथे वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी बैठक घेऊन सतीश जारकीहोळींना काँग्रेस पक्षाने चांगले पद देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सतीश जारकीहोळींना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.