बेळगाव लाईव्ह : बेळगाव नगरविकास प्राधिकरणामध्ये अव्यवहार झाल्याप्रकरणी आरोप पुढे आले असून याप्रकरणाची सीओडी किंवा सीआयडी चौकशी केली जाईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
सुवर्ण विधानसौध येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १ कोटी रुपये किंमत असलेल्या मालमत्तेची २० ते २५ लाखांना विक्री करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दोनवेळा नोटीस काढूनही लोक आले नाहीत. लोक आले असते तर लिलाव करता आला असता.
१ कोटी रुपये किमतीची मालमत्ता २०-२५ लाखांना विक्री करण्यात आली. यादरम्यान १०० कोटींचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोणत्याही कारणास्तव दुर्लक्ष केले जाणार नाही, असेही सतीश जारकीहोळी म्हणाले.
उद्यापासून शाळा प्रारंभ होत आहेत. नव्या शिक्षण धोरणाला आपल्या सरकारचा विरोध असून पाठयपुस्तकातील अनावश्यक विषय वगळण्यासाठी पुढाकार घेण्यात येत असल्याचेही जारकीहोळींनी सांगितले.
याचप्रमाणे त्यांनी बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनासंदर्भातही प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्याचे विभाजन होणे आवश्यक असून आपण सुरुवातीपासूनच विभाजनाबाबत दबाव आणत असल्याचे त्यांनी सांगितले.
केडीपीच्या बैठकीपूर्वी स्वतंत्र विभागीय बैठक घेतली जात आहे. ६ जून रोजी महापालिकेची बैठक होत आहे. राज्यातील जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे त्यामुळे जनतेच्या इच्छेनुसार प्रशासन चालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप सरकारच्या काळात रस्त्यांची पुरेशी देखभाल झालेली नाही. शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती समस्या सोडवण्यासाठी काम केले जाईल. ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज आहे त्या ठिकाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. याप्रकरणी आवश्यकता भासल्यास बेंगळुरू मधून चौकशी केली जाईल. योग्य पुरावे मिळाल्यास आवश्यक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
सुवर्णसौधमध्ये आवश्यक सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्याबाबत अद्याप कोणताही विचार केला नसल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला व बालकल्याण विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार असिफ सेठ, महांतेश कौजलगी, विश्वास वैद्य, चन्नराज हट्टीहोळी आदी उपस्थित होते.