कर्नाटकमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपासाठी प्रचार केला होता. तथापि अखेर या पक्षाला जो पराभवाचा सामना करावा लागला त्याची अनेक कारणे सांगितली जात आहेत. या संदर्भात सोशल मीडियावर राजकीय विश्लेषकांनी केलेले हे विश्लेषण.
सारे देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या बाजूने लागला. त्याच वेळेला भाजपच्या पराभवाचा आकार मात्र अपेक्षेपेक्षा जास्त असल्याचे दिसते. हे दोन परिणाम लक्षात घेता या निवडणुकीचे पाच महत्त्वाचे मुद्दे कोणते यावर विचार करायला हवा. कर्नाटकच्या निवडणुकीतील भाजपच्या पराभवाचा पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बजरंग बली! निवडणुकीत विरोधकांचे सर्व मुद्दे जणू निकालात निघाले आहेत अशा अविर्भावात भाजपने यावेळी बजरंग बलीचा मुद्दा लावून धरला. बजरंग बली हा मुद्दा याचा अर्थ निवडणुकीचा जे राजकीय पातळीवरील मतदान हवं होतं ज्यावर चर्चा व्हायला हवी होती ते सोडून धार्मिक ध्रुवीकरणाच्या नादात भाजप गेला. परिणामी त्याचा पूर्णपणे फज्जा उडाला. मग तो हिजाबचा मुद्दा असेल, गो-मांस असेल या सर्व वादांवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत उत्तर मिळाले.
मुद्दा क्रमांक दोन म्हणजे भाजपचे कर्नाटकामधील सर्वोच्च नेते असे ज्यांचे वर्णन केले जाते ते बी. एस. यडीयुरप्पा. गेल्या वेळी त्यांना भाजपने अत्यंत लज्जास्पद पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून उतरवलं. ते उतरवणे आवश्यकच होतं. कारण त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते. त्यापैकी कांही आरोप सिद्ध होण्याच्या जवळ जातील इतके गंभीर होते. त्यामुळे त्यांना पदावरून काढणं क्रम प्राप्त होतं. मात्र निवडणुका जवळ येत गेल्या तसा भाजपला साक्षात्कार झाला की येडीयुराप्पा यांच्याशिवाय आपल्याला कोणी वाली नाही. म्हणजे इतर वेळी भ्रष्टाचार वगैरे मुद्दे भाजपसाठी नैतिकच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात ते बाजूला ठेवले गेले आणि निवडणुकीच्या तोंडावर भाजपने यडीयुरप्पा यांना जवळ केले. मात्र ही खेळी पूर्णपणे अयशस्वी ठरल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. कारण बी. एस येडीयुराप्पा यांना नरेंद्र मोदी यांनी जवळ केले तरी स्थानिक पातळीवर त्यांना थंडा प्रतिसाद होता. याखेरीज येडीयुराप्पा भाजपने बोलावून घेतलं तरी म्हणावे तसे सर्वाधिकार दिले नाहीत. याचा फटका भाजपला बसला.
तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तो काँग्रेसच्या अनुषंगाने. कारण ही विधानसभा निवडणूक जी आहे ती कर्नाटक राज्यासंदर्भातील होती. कर्नाटक राज्यातील जे कांही प्रश्न आहेत त्यांचा संबंध या निवडणुकीशी असणे अपेक्षित होतं. मात्र भाजपचा असा प्रयत्न होता की ही निवडणूक राष्ट्रीय पातळीवर न्यायची. नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी हा लढा कसा आहे हे चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो पूर्णपणे फसला काँग्रेसने कधी नव्हे तो शहाणपणा दाखवत निवडणुकीचे विषय हे राज्यस्तरीय असतील याची पूर्णपणे काळजी घेतली. त्यामध्ये मग भ्रष्टाचार असेल, 40 टक्के कमिशन असेल किंवा अन्य स्थानिक प्रश्न -समस्या असतील यांचा समावेश होता. गेल्या कांही काळापासून बसलेल्या फटक्यांतून काँग्रेसला आलेले हे शहाणपण म्हणावे लागेल
भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला चौथा मुद्दा म्हणजे भाजपकडून वारंवार दावा केल्या जाणाऱ्या डबल इंजिन सरकारचा. डबल इंजिन सरकार ही अत्यंत भ्रामक कल्पना आहे. भारतासारख्या संघराज्य व्यवस्थेमध्ये डबल इंजिन सरकार ही कल्पनाच मांडता कामा नये इतकी ती वाईट आहे. कारण संघराज्य याचा अर्थ प्रत्येक राज्याला त्याचा अधिकार असतो. मात्र या सर्व संकल्पना बाजूला सारून भाजप सातत्याने डबल इंजिन सरकार कल्पना पुढे रेटू पाहतोय. तसे केल्यामुळे काय होतं ते हिमाचल प्रदेशमध्ये दिसले आहे. मणिपूरमध्ये भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता त्याचा तिसरा फटका भाजपला कर्नाटक निवडणुकीत बसला आहे. डबल इंजिन सरकार म्हणजे मी करेन तेच सगळं, तेच बरोबर बाकी सगळ्यांना कांही किंमत नाही, ते सगळे माल गाडीचे मागे ओढले जाणारे डबे असे जेंव्हा चित्र होतं तेव्हा काय होतं हे आपल्याला कर्नाटकच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. भारतासारख्या प्रचंड देशात स्थानिक पातळीवर नेतृत्व असायलाच हव हे ताकदीने मांडावं लागतं. ते भाजप मांडू शकला नाही. आमचा आपला एकच हुकूमाचा एक्का तो एक्का कोण? ते सांगायची गरज नाही. मात्र त्याचे परिणाम काय झाले ते या निवडणुकीने दाखवून दिले आहे.
आता शेवटच्या पाचव्या मुद्द्याच्या बाबतीत पुन्हा काँग्रेसच्या बाजूने विचार करायला हवा. काँग्रेसने दिलेली विविध आश्वासने, ज्यामध्ये महिलांना मोफत प्रवास, आर्थिक मदत, घरगुती गॅसच्या बाबतीतील अनुदाना वगैरे याचा अतिशय मोठा फायदा काँग्रेसला या निवडणुकीत झाला. भाजपने या सर्वांचे वर्णन आपल्या नेहमीच्या भाषेत ‘रेवडी’ असे केले होते.
मी दिलं तर ते गरिबांच्या हितासाठी आणि इतरांनी दिलं तर ती ‘रेवडी’ असा नवा पायंडा अलीकडे पडू लागला आहे. मात्र काँग्रेसने ज्या पाच योजना जनतेसाठी जाहीर केल्या, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष करून त्या अनुषंगाने महिलांनी भरभरून मते काँग्रेसला दिली. सदर पाच मुद्दे भाजपच्या पराभवाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक ठरतात.