दरवर्षीप्रमाणे श्री शिवजयंती मिरवणुकीनिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे समितीने नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या सहकार्याने सजीव देखावे सादर करणाऱ्या मंडळांसाठी यंदा देखील मोफत रंगभूषा (मेकअप) करून देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने आजच्या वडगाव भागातील श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुक चित्ररथांमधील शिवकालीन पात्रांची रंगभूषा करण्यात आली.
गोवावेस येथील प्रियांका हॉटेल समोरील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संपर्क कार्यालयाच्या ठिकाणी शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील कलाकारांच्या मेकअप अर्थात रंगभूषेची व्यवस्था करण्यात आली आहे.
वडगाव येथील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आता आज सायंकाळी प्रारंभ होत आहे. या मिरवणुकीत शिवकालीन सजीव देखावे सादर केले जाणार आहेत. या देखाव्यांमधील विविध शिवकालीन पात्रांची गोवावेस येथील समितीच्या कार्यालयाच्या ठिकाणी दुपारी 1 वाजल्यापासून रंगभूषा करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी स्वाती हट्टीकर, रेखा हट्टीकर, ऐश्वर्या बिर्जे, मयुरी पाटील, ऋत्तिका दळवी, अश्विनी, दया देसाई, हेमंत बिर्जे, विशाल पाटील, गजानन नावगेकर आणि विशाल कंग्राळकर हे सर्व रंगभूषाकार विशेष परिश्रम घेताना दिसत होते.
शिवजयंती मिरवणुकीसाठी मोफत रंगभूषा करून देण्याचा हा उपक्रम म. ए. समितीच्या वरिष्ठ नेत्यांसह जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील, प्राचार्य आनंद आपटेकर, विशाल कंग्राळकर व सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जात आहे.
वडगाव येथील श्री शिवजयंती मिरवणुकीसाठी आज विविध शिवकालीन व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जवळपास शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांची रंगभूषा करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे सदर उपक्रम उद्या शनिवारी होणाऱ्या बेळगाव शहराच्या प्रमुख श्री शिवजयंती मिरवणुकीसाठी देखील राबविला जाणार असून श्री शिवजयंती उत्सव मंडळांनी उद्या दुपारी 1 वाजल्यापासून राबविल्या जाणाऱ्या या मोफत उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.