बेळगाव शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. हवामान खात्याने बेळगावचा पारा मे महिन्यात 40 अंशावर जाईल असा अंदाज गेल्या एप्रिलमध्ये वर्तविला होता. त्यानुसार आज गुरुवारी दुपारी 4:08 वाजता बेळगावचे कमाल तापमान तब्बल 40.4 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते.
उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरातील सर्वसामान्य जनता हैराण झाली असून बरेच जण दुपारी घराबाहेर पडणे टाळू लागले आहेत. तापमान वाढीचा परिणाम बाजारपेठेवर झाला असून दुपारनंतर बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरू लागला आहे.
बाजारहाट करण्यासाठी बहुतांश शहरवासीय सायंकाळच्या वेळी घराबाहेर पडताना दिसत आहेत. एकंदर दिवसभरातील उन्हाच्या वाढत्या झळा जनजीवन विस्कळीत करणाऱ्या ठरत आहेत.
उष्म्यामुळे फॅन, एसी व कुलर यांच्या वापरात वाढ झाली असून दिवसा घराबाहेर पडलेली मंडळी गारवा शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आईस्क्रीम आणि शीतपेयांकडे वळताना दिसत आहेत.
त्यामुळे शहरातील कोल्ड्रिंक हाऊस चालक आणि रस्त्याकडेला आईस्क्रीम -शीतपेयांची विक्री करणाऱ्यांचा धंदा सध्या तेजीत आहे. इतर व्यवसायिकांना मात्र वाढत्या तापमानामुळे ग्राहक नसल्याने चटके सहन करावे लागत आहेत.