दुखावल्याखेरीज सापा सारख्या सरपटणाऱ्या प्राण्यासह कोणताही वन्यजीव मनुष्याच्या वाटेला जात नाही याचे प्रत्यंतर हलगा गावामध्ये काल सायंकाळी आले. जेंव्हा आपल्या विषारी फन्यासमोर बालिकेची पावले असतानाही त्यांना दंश न करता अस्सल नाग साप आपल्या वाटेने निघून गेला. दैव बलवत्तर म्हणून ती बालिका बचावली असली तरी सदर उरात धडकी भरवणारी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, हालगा गावातील सुहास सैबन्नावर यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्या घराच्या दर्शनीय भागात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. काल सायंकाळी सैबन्नावर यांच्या मुलाशी खेळण्यासाठी शेजाऱ्यांची मुलगी घरी आली होती. सदर मुलगी नेहमीप्रमाणे रमत गमत आपल्या घरातून सैबन्नावर यांच्या दारापर्यंत आली.
तत्पूर्वी एक नाग साप भिंतीकडेने सैबन्नावर यांच्या दारापर्यंत पोचला होता. ती मुलगी सापासमोरून जाताच तिच्या चाहुलीने सापाने फुत्कार टाकला. तेंव्हा मागे सरून त्या मुलीने सैबन्नावर यांच्या घरात पळ काढला आणि त्यांना सापाबाबत माहिती दिली. मात्र तोपर्यंत तो साप दिशा बदलून शांतपणे आपल्या वाटेने निघाला होता.
सदर घटनाक्रम सैबन्नावर यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून नागसापाच्या तोंडासमोर त्या मुलीचा अनवाणी पावलांचा वावर श्वास रोखून धरणारा आहे.
तथापि मुलीची पावले समोर असताना देखील तो नाग साप आक्रमक झाला नाही किंवा त्याने तिला दंशही केला नाही. तो साप दुखावला गेला नसल्यामुळे दैव बलवत्तर म्हणून ती मुलगी बचावली.
दरम्यान सुहास सैबन्नावर यांनी सापाबाबतची माहिती सर्पमित्र रामा पाटील यांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन शिताफीने त्या नाग सापाला पकडले आणि नंतर नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.