Home बातम्या हालात्री नदीत दुर्दैवी अपघात; शेडेगाळीतील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
belgaum

हालात्री नदीत दुर्दैवी अपघात; शेडेगाळीतील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू

0
हालात्री नदीत दुर्दैवी अपघात; शेडेगाळीतील शेतकऱ्याचा बुडून मृत्यू
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील शेडेगाळी गावात आज शुक्रवारी (ता. 20) सकाळी सुमारे अकराच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका शेतकऱ्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. देवाप्पा महादेव गुरव (वय 48) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

माहितीनुसार, देवाप्पा गुरव हे आपल्या मुलासह सकाळी शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. मुलाने पंपसेट सुरू केल्यानंतर घरात गॅस आल्यामुळे तो घरी परतला. दरम्यान, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने पंप बंद पडला. त्यामुळे पंप पुन्हा सुरू करण्यासाठी देवाप्पा गुरव नदीकाठी गेले असता त्यांचा तोल जाऊन पाय घसरला आणि ते थेट हालात्री नदीच्या पाण्यात पडले.

त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेच्या वेळी त्यांचा मोबाईल शेतातच राहिल्यामुळे मुलाने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने मुलगा पुन्हा शेतात गेला असता वडील दिसून न आल्याने शोध घेण्यात आला. त्यावेळी नदीकाठी घसरल्याचे लक्षात आले आणि तात्काळ नातेवाईकांना माहिती देण्यात आली.


घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलीस तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने नदीपात्रात शोधमोहीम राबवण्यात आली. जवळपास तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर देवाप्पा यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री 9.00 वाजता शेडेगाळी गावात अंत्यसंस्कार पार पडले.

देवाप्पा गुरव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार असून त्यांच्या आकस्मिक निधनाने शेडेगाळी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.