बेळगाव लाईव्ह : मागील वर्षीपासून मे महिन्याच्या अखेरीस शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्यात येत असून यंदा २९ मे पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे. जिल्हा पंचायत व शिक्षण खात्याकडून शाळा प्रारंभोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत असून पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचा आनंद घेता येणार आहे.
गुरुवारी बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांची जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी शाळा प्रारंभोत्सव पूर्व तयारी बैठक बोलाविली होती. या बैठकीत शिक्षण खात्याने प्रत्येक शाळेला १६ सूचना केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पहिल्याच दिवशी शिक्षकाने हजर असावे, वर्गखोल्या परिसर भोजनालय, भांडी, पाण्याची टाकी यांची स्वच्छता करावी, प्रारंभोत्सवाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची हजेरी नोंदवावी, पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण द्यावे, वर्ग आणि शाळेचे वेळापत्रक तयार करावे, शाळेचे एसडीपी आणि एसएपी सिद्ध करणे, ३० मेपूर्वी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश द्यावेत, मुलांचे आधार व्हेरिफिकेशन केले जावे, १ जूनपासून अभ्यासक्रमाला सुरुवात करावी, १ जून ते १८ जुलैपर्यंत ४० दिवस पहिली प्रवेशप्रक्रिया राबवावी, सेतूबंध कार्यक्रम सुरू करावा, शाळेतील निरुपयुक्त वस्तूंची विल्हेवाट लावावी अशा सूचनांचा समावेश आहे.
शाळा स्वच्छतेसह शाळेला तोरण बांधून, विद्यार्थ्यांचे आपुलकीने स्वागत करण्यात यावे, असेही बैठकीत सुचवण्यात आले आहे. शाळा प्रारंभापासून पाठ्यपुस्तके वितरण आणि इतर शैक्षणिक उपक्रम राबवण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. २९ मे रोजी सर्व शिक्षकांना शाळेत हजर राहणे गरजेचे असून ३० मे रोजी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आणि गणवेश दिले जाणार आहेत. १ ते १५ जूनपर्यंत शिक्षण खात्याचे अधिकारी प्रत्येक शाळेला अचानक भेट देणार आहेत. यामुळे त्यादिवशी शिक्षकांना वेळेत हजेरी लावावी लागणार असून शिक्षण अधिकाऱ्यांकडून शाळेतील आवश्यक त्या दाखल्यांची तपासणी होणार आहे. यावेळी शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन हर्षल भोयर यांनी केले.
या बैठकीला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी बसवराज नलतवाड, चिकोडीचे जिल्हा शिक्षणाधिकारी मोहन कुमार हंचाटी आदी उपस्थित होते.