बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या असून मतदानासाठी आज अखेरचा दिवस शिल्लक राहिला आहे. गेल्या पंधरवड्यात विविध राष्ट्रीय पक्षांच्या राष्ट्रीय नेत्यांनी सीमाभागासह संपूर्ण कर्नाटकाचा दौरा करत आपापल्या पक्षांसाठी मतयाचना केली असून १० मे रोजी सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
कर्नाटक विधानसभेत सीमावासियांच्या बाजूने आवाज मांडण्यासाठी यंदा महाराष्ट्र एकीकरण समितीने कम्बर कसून प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर लोकसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सीमावासियांच्या आशा पल्लवित झाल्या असून विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने एकच एक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवत निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या पंधरा दिवसात बेळगाव ग्रामीण, बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि खानापूर मतदार संघात जल्लोषी आणि ताकदीचा प्रचार समिती उमेदवारांचा झाला असून विधानसभा निवडणुकीत मराठी भाषिक कसोशीने समिती उमेदवारांना निवडून देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषिक हालअपेष्टा सोसत आहे. आपली ताकद, आपला स्वाभिमान आणि आपले अस्तित्व आता सिद्ध करण्याची आणि कर्नाटक सरकारला दाखवून देण्याची वेळ आली आहे.
गेल्या कित्येक वर्षात घटनेने दिलेल्या अधिकारांपासून सीमाभागातील मराठी भाषिक वंचित आहे. न्याय्य हक्काने आंदोलन आणि संघर्ष करूनही मराठी भाषिकांवरील अन्यायाचा पाढा संपता संपत नाही आहे. या सर्व गोष्टींना वैतागलेला मराठी भाषिक आता पेटून उठला असून विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी निवडून विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
ग्रामीणमधील पैशांच्या जोरावर विकत घेण्यात येणारी मराठी भाषिकांची मते, उत्तरमध्ये मराठा आणि मराठीला डावलून करण्यात आलेले राजकारण, दक्षिणमधील दडपशाही आणि खानापूरमध्ये समितीच्या झेंड्याखाली एकवटलेला मराठी भाषिक या साऱ्या गोष्टी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पथ्यावर पडतील आणि मराठी भाषा, मराठी भाषिक, मराठी भाषिकांची अस्मिता आणि मराठी भाषिकांच्या संस्कृतीचे मानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवरायांवरून करण्यात येणारे राजकारण याला सडेतोड उत्तर देण्यासाठी मराठी भाषिक जनता सज्ज झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसात समितीच्या उमेदवारांच्या पाठीशी झंझावाती प्रचाराच्या माध्यमातून मराठी भाषिकांनी पाठिंबा दर्शविला आहे. सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा जरी थंडावल्या असल्या तरी १० मे रोजी होणाऱ्या मतदानात आणि १३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात गुलाल आपलाच उधळला जाईल, असा ठाम विश्वास मराठी भाषिक व्यक्त करत आहेत.