Saturday, April 20, 2024

/

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, पोलीस बंदोबस्त तैनात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बुधवार दि. १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून निर्भयपणे मतदान पार पाडण्यासाठी सुमारे दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी मतमोजणी कक्ष व स्ट्रॉंग रूमला भेट देऊन निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व स्पष्ट केले. आरपीडी महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मतमोजणी केंद्राच्या आवारातील मीडिया सेंटरमध्ये सोमवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

आगामी चार दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे पावसासाठीही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील १८ मतदारसंघात एकूण १८७ उमेदवार रिंगणात आहेत. १७४ पुरुष आणि १३ महिला आहेत. जिल्ह्यात ३९ लाख ४७ हजार १५० मतदार असून २० हजार ४२४ सेवा मतदारांसह एकूण ३९ लाख ६७ हजार ५७४ लोक मतदान करणार आहेत. हवामान विभागाने आगामी चार दिवस पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रशासनाने पावसाला तोंड देण्याची जय्यत तयारी केली आहे. सुमारे सातशे ताडपत्र्यांची खरेदी करण्यात आली आहे. गळके मतदान केंद्राची पाहणी करुन तात्काळ उपाय योजना करण्यात आल्या आहेत. सर्व एव्हीएम यंत्रांना प्लास्टिकचे आच्छादने करण्यात आली आहेत. निवडणूक कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांनाही पाऊस शक्यता गृहित धरुन योग्य ती खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

याचप्रमाणे निवडणूक प्रचारासाठी परप्रांतातून आलेल्या कुणालाही मतदारसंघात थांबण्यास परवानगी नाही. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्राच्या २०० मीटर बाहेर एकच टेबल आणि दोन खुर्ची ठेवण्याची परवानगी असेल, मतदान कर्मचारी ९ मे रोजी मतदानाच्या ठिकाणाहून त्यांच्या नियुक्त मतदान केंद्रावर जातील. जे निवडणूक कर्मचारी योग्य कारणाशिवाय कामचुकारपणा करतील त्यांच्यावर फौजदारी कारवाई करणार येईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.Dc bgm

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उच्च पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली असून, शेवटच्या क्षणी बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी संयुक्त चेकपोस्ट देखील स्थापन करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसप्रमुख संजीव पाटील यांनी दिली. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी बोलताना, मतदारांना आमिष किंवा भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोकांनी कोणत्याही प्रकारची चिंता न करता मतदान करावे. मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हाभरात मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली आहे, असे सांगितले.

यावेळी पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदींसह विविध अधिकारी आणि निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.