Friday, April 19, 2024

/

विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदानाला सुरुवात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकाच्या १६ व्या विधानसभेच्या २२४ मतदार संघांसाठी आज मतदान होत असून कर्नाटक राज्य प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदातानाची तयारी पूर्ण केली आहे. आज सकाळी ७ पासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदारांनी मतदार केंद्रावर गर्दी केली आहे. सकाळी ११.३० पर्यंत जिल्ह्यात २४ टक्के मतदारांनी मतदान केले असून येत्या काही तासांमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना मंगळवारी प्रात्यक्षिक दाखवून मतदान यंत्र सुपूर्द करण्यात आले असून निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कर्नाटकात शेजारील राज्यातील पोलिसांची अधिक कुमक मागविली आहे.

राज्यात एकूण ५८ हजार ५४५ मतदान केंद्रे स्थानापन्न करण्यात आली असून त्यापैकी ९९६ मतदान केंद्र सखी म्हणून तर २३९ मतदान केंद्र दिव्यांगांसाठी नियोजित करण्यात आली आहेत. सकाळी ११.३० पर्यंत झालेल्या मतदानात अथणी पहिल्या क्रमांकावर आहे तर चिकोडी – सदलगा भागात सर्वाधिक कमी मतदानाची नोंद झाली आहे.

 belgaum

देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज बुधवारी सकाळी 7 वाजता प्रारंभ झाला असून सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या सत्रात राज्यात एकूण 8.26 टक्के तर बेळगाव जिल्ह्यात 7.47 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. मात्र सकाळी नऊ नंतर जिल्ह्यातील मतदानात झपाट्याने वाढ होऊन सकाळी 11 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यात 22.42 टक्के मतदानाची नोंद झाली. प्रारंभीच्या सत्रात मतदारांचा फारसा प्रतिसाद नसलेल्या शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळी 9 नंतर मतदारांची गर्दी वाढवून रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले.Voting

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी ठिक 7 वाजता प्रारंभ झाला. मतदान शांततेने सुरळीत पार पडावे यासाठी प्रत्येक मतदार केंद्र परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रारंभी सकाळी कांही अपवाद वगळता उर्वरित सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदानासाठी फारशी गर्दी झाली नव्हती. मॉर्निंग वॉकर्स तसेच ज्यांना दिवसभर अन्य कामाचा व्याप आहे अशी मंडळी तसेच परगावी जाणारी मंडळी अशा मोजक्या मतदारांनी प्रारंभीच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे जवळपास सर्व मतदार केंद्रावर मतदारांची तुरळक गर्दी दिसत होती. तथापि सकाळी 9 वाजता नंतर मात्र प्रत्येक मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊन मोठ्या रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने सकाळी 9:22 वाजता जाहीर केलेल्या जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान टक्केवारीमध्ये सर्वाधिक मतदान सौंदत्ती -यल्लमा मतदारसंघात 11.03 टक्के इतके, तर सर्वात कमी मतदान रामदुर्गमध्ये 4.57 टक्के इतके झाले होते.

आज सकाळी प्रारंभीच्या सत्रात शहरातील बऱ्याच मतदार संघामध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे कांही ठिकाणी ईव्हीएम मशीनची मतदान यंत्रणा बंद पडली होती. परिणामी सकाळी लवकर मतदान केंद्राच्या ठिकाणी हजर होऊन उत्साहाने कामाला लागलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांवर हताश होऊन वीज पुरवठा केंव्हा सुरू होतो याची वाट पाहण्याची वेळ आली होती. तथापि याबाबतची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने तात्काळ कार्यवाही करत संबंधित मतदान केंद्रांवरील वीज पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होईल याची व्यवस्था केली. एकंदर आज सकाळी 9 वाजल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले. गेल्या दोन-तीन दिवसापासून दुपारनंतर शहर परिसरात वळीवाची हजेरी लागत असल्यामुळे बऱ्याच मतदारांचा पाऊस येण्यापूर्वी मतदान उरकण्याकडे कल आहे. त्यामुळे आज दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात मतदान होईल असा जाणकारांचा अंदाज आहे.

दरम्यान राज्यभरात आज सकाळी पहिल्या टप्प्यात 9 वाजेपर्यंत एकूण 8.26 टक्के इतक्या मतदानाची तर बेळगाव जिल्ह्यात 7.47 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली होती. त्यानंतर सकाळी 9:22 वाजता भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने जाहीर केलेल्या बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदारसंघा मधील सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. निपाणी 6.2 टक्के, चिकोडी -सदलगा 7.72 टक्के, अथणी 9.06 टक्के, कागवाड 8.7 टक्के, कुडची 10.54 टक्के, रायबाग 9.15 टक्के, हुक्केरी 7.17 टक्के, अरभावी 5.41 टक्के, गोकाक 7.94 टक्के, यमकनमर्डी 7.68 टक्के, बेळगाव उत्तर 7.18 टक्के, बेळगाव दक्षिण 5.57 टक्के, बेळगाव ग्रामीण 6.06 टक्के, खानापूर 7.16 टक्के, कित्तूर 6.12 टक्के, बैलहोंगल 6.6 टक्के, सौंदत्ती यल्लमा 11.03 टक्के आणि रामदुर्ग 4.57 टक्के.

जिल्ह्यातील 18 पैकी कांही मतदार संघात थेट काँग्रेस विरुद्ध भाजप लढत आहे, तर कांही मतदारसंघांमध्ये प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष यांच्यात कडवी झुंज होईल असा अंदाज आहे. दुसरीकडे बेळगाव आणि खानापूर तालुक्यात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांसमोर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.