बेळगाव लाईव्ह : बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात सीमाभागात विविध घडामोडी घडल्या. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधार्थ प्रचार करण्यासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांना विरोध करण्याचे आवाहन केले. यानंतर आज टिळकचौक येथे झालेल्या भाजपच्या जाहीर प्रचार सभेस उपस्थित असलेले देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना काळे निशाण दाखविण्यात आले.
यापूर्वी महाराष्ट्रातून कर्नाटकात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेतेमंडळी प्रचारासाठी येत. मात्र सीमाभागात प्रचार करणे आवर्जून टाळत असत. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख यांच्यासारखे अनेक नेते राष्ट्रीय पक्षांच्या आदेशाला धुडकावून लावण्याची धमक बाळगून होते. मात्र अलीकडे सत्तेत आलेल्या अनेक नेत्यांना सीमाप्रश्नाविषयी किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीविषयी माहिती नाही. परिणामी सीमाभागात समितीच्या विरोधार्थ प्रचाराला येऊन नव्या नेत्यांनी हि परंपरा बदलली आहे.
सीमाभागात प्रचाराला न येणे हा ६० वर्षांपासूनचा अलिखित नियम आहे. मात्र महाराष्ट्रात राहून सीमाप्रश्नाविषयी केवळ बोलघेवड्याप्रमाणे वागणाऱ्या नेत्यांना सीमाभाग, सीमाप्रश्न आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास नाही, हे दिसून येत आहे. बेळगावमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचा फज्जा उडाला. महाराष्ट्रात जाऊन भेट घेणाऱ्या सीमाभागातील नेतेमंडळींना साथ देण्याचे आश्वासन देणाऱ्या फडणवीसांना आज सीमाभागातील मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
बुधवारी समिती उमेदवारांच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना खासदार संजय राऊत यांनी समिती कार्यकर्त्यांना आवाहन केले. आणि या आवाहनानुसार आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यासह अशोक चव्हाण आणि सतेज उर्फ बंटी पाटील यांना काळे निशाण दाखवून आपला संताप व्यक्त केला. सकाळी टिळकचौक परिसरात काळे निशाण दाखविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर सायंकाळी अशोक चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविण्यात आला.
बेळगावमध्ये घडणाऱ्या घटनांचे पडसाद सर्वप्रथम कोल्हापूरमध्ये उमटतात. मात्र कोल्हापूरचे सतेज उर्फ बंटी पाटील यांना सीमाभाग, सीमाप्रश्न आणि सीमावासियांबाबत किंचितही आस्था नाही. बंटी पाटील हे सीमाप्रश्नासंदर्भात कधीच अग्रक्रमावर नसतात. २ महिन्यांपूर्वी येळ्ळूर राजहंसगडावर झालेल्या छत्र. शिवाजी महाराज मूर्ती अनावरण कार्यक्रमात देखील त्यांनी सीमावासियांच्या विनंत्या डावलून, सीमावासियांच्या नाकावर टिच्चून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून त्यांनी सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळले. आणि पुन्हा दोन महिन्यांच्या कालावधीच्या आत पुन्हा एकदा त्यांनी सीमाभागात उपस्थिती दर्शविली. बंटी पाटील यांच्या या भूमिकेमुळे कोल्हापूर आणि बेळगावच्या नात्याला तडा जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांनी बंटी पाटलांना मराठी द्वेष्टे म्हणावे का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१८ साली झालेल्या निवडणुकीदरम्यान अशोक चव्हाण यांनी सीमाभागात उपस्थिती दर्शविली. खानापूरच्या आमदार अंजलीताई निंबाळकर या त्यांच्या नातेवाईक असल्याकारणाने सीमाभागात होणाऱ्या निवडणुकीदरम्यान अशोक चव्हाण सक्रियपणे सहभाग दर्शवितात. मागील निवडणुकीत देखील त्यांनी जाहीर सभा घेतली होती. आणि आतादेखील ते जाहीर सभा घेण्याच्या तयारीत आहेत. पूर्वाश्रमीचे अशोक चव्हाण हे वसंतदादा पाटील यांच्यासमवेत सीमाप्रश्नाच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत होते. विलासराव देशमुख यांच्या पुढाकारातूनच सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला होता. मात्र त्यांचे चिरंजीव धीरज देशमुख हेदेखील राजहंसगडावरील कार्यक्रमात सीमावासीयांनी विरोध दर्शवून देखील कार्यक्रमास उपस्थित राहिले.
सीमाभागात मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी मराठी भाषिक सीमावासीय तळमळत आहे. मात्र मराठीच्या विरोधार्थ उतरून मराठीच्या विरोधार्थ प्रचार करणारे नेते हे मराठीचे मारेकरी ठरत आहेत. अशा नेत्यांना स्वतःला मराठी म्हणून घेण्याची क्षमता आहे का? महाराष्ट्रात स्वतःला मराठी म्हणून मिरवणाऱ्या नेत्यांना स्वतःला मराठी म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? मराठीचा अभिमान बाळगून महाराष्ट्रात ते निवडून येऊ शकतात का? हे तपासून पाहणे आणि स्वतः मराठी असल्यासंदर्भात आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.