कोल्हापूरकर नेहमीच बेळगावकरांच्या पाठीशी उभे राहिलेत. मात्र बंटी पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका ही कोल्हापूरकरांच्या वस्तुनिष्ठतेशी सुसंगत नाही आहे. जसं एखादं गावं एका विचाराने चालतं. त्यावेळी तो विचार समस्त गावकऱ्यांचा असतो. मात्र कोल्हापूरचे नेते म्हणून घेणाऱ्या या दोन नेत्यांच्या विचारांमध्ये कोल्हापूरकरांच्या कोणत्याही विचारांचा मागमुस दिसत नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांशी असलेली त्यांची नाळ तुटली आहे असे म्हणावे लागेल. पैशाच्या मागे लागलेले हे धनदांडगे सामान्य कोल्हापूरकर आणि सामान्य बेळगावकरांशी आपलं नातं कधीच गमवून बसले आहेत. आज सामान्य मराठी माणूस मराठी भाषा संस्कृती आणि अस्मितेसाठी झगडत आहे. मात्र याची सदर दोन्ही नेत्यांना चाड नसल्यामुळेच त्यांनी अशा प्रकारची भूमिका घेतल्याचे दिसते.
आज बेळगावातील राजकारण एका वेगळ्या टप्प्यावर पोहचले आहे. येथील सामान्य जनतेला दररोज प्रशासनाशी झगडावे लागत आहे. आपल्या न्याय हक्कांसाठी त्यांचा रोजचा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नेते या पद्धतीने उलटी भूमिका घेत असल्यामुळे बेळगावकर मराठी माणूस कासावीस होताना दिसत आहे. बंटी पाटील म्हणजे सत्यजित पाटील यांनी दोन महिन्यापूर्वी येळ्ळूर राजहंसगडावरील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोन -दोन वेळा झालेल्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थिती दर्शवून म. ए. समिती आणि मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले होते. त्यावेळी केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरून आपण कार्यक्रमाला आलो असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव केली होती. आता देखील परत ते केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यावरून येत असतील तर बेळगावच्या संबंधित चार मतदार संघासाठी असलेली आपली मराठी अस्मिता ते आपल्या नेत्यांना सांगू शकत नाहीत का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी बेळगाव उत्तर मतदार भाजपच्या रवी पाटील यांच्या साठी बैठका सभा घेत मत याचना करतआहेत तर बंटी पाटील हे काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासाठी प्रचार करत आहेत विशेष म्हणजे कोल्हापूर चे मराठा समाजाचे नेते असलेले दोघेही बेळगावात मराठा सोडून लिंगायत समाजाच्या उमेदवारासाठी मते मागत आहेत.
ज्यावेळी एखादा नेता अशी प्रतिकूल भूमिका घेतो. त्यावेळी सीमावर्तीय भागातील मराठी माणूस हवालदिल होतो. कारण त्याची एक भूमिका असते की एका वेगळ्या प्रशासना विरोधात आमचा संघर्ष सुरू आहे. यावेळी ज्यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे, तेच विरोधी गटात सामील होत आहेत. कौरव -पांडवांच्या महाभारताच्या युद्धामध्ये आप्तस्वकीय विरोधी पक्षात दिसू लागले त्यावेळी हताश झालेल्या अर्जुनाप्रमाणे सध्या सीमावर्तीय भागातील मराठी नेते आणि कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. लढायचे कोणाशी स्वकीयांशी की विरोधकांशी? अशी त्यांची संभ्रमावस्था आहे. सर्वसामान्य मराठी माणूस आपली भाषा, संस्कृती आणि अस्मितेसाठी झगडत असताना अशा पद्धतीची भूमिका घेणाऱ्या या नेत्यांचा कान कोणत्या पद्धतीने पिळायचा? याचाच विचार सीमाभागातील मराठी माणूस करत आहे.
आज बेळगावातील अनेकांचे कोल्हापूरमध्ये नातेसंबंध आहेत. बेळगाव व कोल्हापूर यांचे मैत्रीपूर्ण नाते आहे. त्यासाठीच या दोन्ही गावांच्या बाबतीत ‘तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!’ असे म्हंटले जाते. आता पुढे महाराष्ट्रात निवडणुका होतील. त्यावेळी कोल्हापूरच्या भूमीत बंटी पाटील, धनंजय महाडिक सारखे नेते निवडणूक रिंगणात असतील. तेंव्हा हजारोच्या संख्येने बेळगाववासीय त्यांच्या विरोधात प्रचाराला जातील किंवा त्या नेत्यांना सीमावासीय मराठी माणसाचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. आजवरचा इतिहास आहे की सीमावृत्तीय भागात जे घडतं त्याला ऐतिहासिक दाखले आहेत. ज्यांनी ज्यांनी सीमा प्रश्न विरोधात भूमिका घेतली त्यांची पुढची राजकीय कारकीर्द अत्यंत धोक्यात आली किंवा नेस्तनाबूत झाली आहे. ज्या लोकांनी दिमाखात सांगितले की ‘तुम्ही कर्नाटकातच राहा’ त्या लोकांच्या पक्षांना एकही आमदार निवडून आणता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे. ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातील राजकर्त्यांनी सीमावासीयांच्या विरोधात भूमिका घेतली त्यांचे पुढील राजकारण धोक्यात आले आहे. जे नेते आज बेळगाव सीमाभागात येऊन सीमावासीयांच्या भावनांची पायमल्ली करत आहेत. विशेष करून देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, गिरीश महाजन, चित्रा वाघ, बंटी पाटील व धनंजय महाडिक ही मंडळी सीमावासीय मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. सीमावासियांचा या सर्वांना इशार आहे की खाल्ल्या मिठाला न जाणाऱ्या अवलादींना आम्ही त्यांची जागा नक्की दाखवून देऊ. त्याचबरोबर कोल्हापूरवासियांना साद आहे की ‘तुमचं आमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय!!!