बेळगाव लाईव्ह : बेळगाव उत्तर मतदार संघाचे समिती उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना दिवसेंदिवस उत्तर मतदार संघातील मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. आज सदाशिव नगर भागात आयोजिण्यात आलेल्या प्रचारादरम्यान याचा प्रत्यय आला असून समितीच्या विजयासाठी मराठी भाषिकांसह इतर भाषिक मतदारही एकवटले असल्याचे दिसून येत आहे.
सदाशिव नगर भागातील नागरिकांनी आज अमर येळ्ळूरकर यांना विजयी करण्याचा निश्चय व्यक्त केला. यावेळी बोलताना अमर येळ्ळूरकर यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना आवाहन केले. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात महाराष्ट्रातील नेतेमंडळी प्रचारासाठी येत आहेत. देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण, चित्रा वाघ यासारख्या नेत्यांनी सीमाभागात प्रचाराला येण्याऐवजी २ महिने वास्तव्यासाठी येऊन येथील मराठी भाषिकांवर होणारे अन्याय, अत्याचार, कर्नाटक सरकारचे जुलूम, मराठी भाषिकांविरोधात रचण्यात येणारी कटकारस्थाने, मराठी भाषा संपविण्यासाठी कर्नाटक सरकारचा सुरु असलेला खटाटोप या साऱ्या गोष्टी अनुभवाव्या. जर या सर्व गोष्टी त्यांना पटत असतील तरच त्यांनी बेळगावमध्ये यावं अन्यथा येऊ नये.
जर महाराष्ट्रातील नेते सीमाभागात समितीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत असतील तर त्यांना येथील जनता नक्कीच विरोध करेल. काल महाराष्ट्रातील नेत्यांना काळे निशाण दाखवून सीमावासीयांनी आपला निषेध नोंदवला आहे. सीमाभागात समितीसंदर्भात चांगल्या गोष्टी घडत असताना महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमाभागात येऊन समिती विरोधात प्रचार करू नये, असे आवाहन अमर येळ्ळूरकर यांनी केले.
अमर येळ्ळूरकर पुढे म्हणाले, महाराष्ट्रातील नेत्यांच्या माध्यमातून बेळगावमध्ये समितीच्या विरोधात प्रचार सुरु आहे. या नेत्यांच्या भूलथापांना बळी न पडता, कोणत्याही आमिषाला बळी न पडता आगामी निवडणुकीसाठी मराठी भाषिकांसह इतर सर्व भाषिकांनी जो निर्धार केला आहे,
तो निर्धार आणि निश्चय तडीस न्यावा, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून मतदार संघाचा सर्वांगीण विकास होणार हे जनतेनेही आता मान्य केले असून एक गठ्ठा मते समितीला मिळतील, आणि आपला विजय निश्चित असेल, असा विश्वासही अमर येळ्ळूरकर यांनी व्यक्त केला.