मतदानाची टक्केवारी वाढावी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यासाठी कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी होणाऱ्या मतदानादिवशी राज्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दरवेळी शनिवार किंवा रविवार हा दिवस निवडला जातो. सुट्टीच्या दिवशी सर्वांना मतदान करता यावे हा यामागील उद्देश असतो. तथापि अनेक लोक मतदानाचा हक्क न बजावता केवळ सुट्टी म्हणून सहल काढण्यावर भर देतात. निवडणूक आयोग राज्यात आणि देशात चांगले सरकार यावे म्हणून प्रयत्नशील असते.
त्यासाठी सार्वजनिक क्षेत्रांसह खाजगी क्षेत्रात वेतनासहित रजा दिली जाते. मतदानाच्या दिवशी सर्व खाजगी कारखाने आणि व्यावसायिक आस्थापने बंद ठेवली जातात.
भारतात मतदानाची सक्ती नसली तरी सर्वांनी मतदान करावे यासाठी अनेक जनजागृती कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून हाती घेतले जातात. तथापि बरेच लोक मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळाल्यानंतर मतदान करण्याऐवजी मित्र किंवा कुटुंबीयांसमवेत पर्यटन स्थळांच्या ठिकाणी सहलीला जाण्याचा बेत आखतात.
त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरते यासाठी यंदा निवडणूक आयोगाने मतदानाचा दिवस हा बुधवार ठरविला आहे. हे करण्याबरोबरच टक्केवारी वाढीसाठी मतदानादिवशी पर्यटन स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.