बेळगाव लाईव्ह : राजकारणाच्या पटलावर परस्पर विरोधी भाष्य करणारे, टीका-टिप्पण्या करणारे राजकारणी कमी नाहीत.
परंतु आपले वैर केवळ राजकीय पटलावर मर्यादित ठेवणे आणि वैयक्तिक पातळीवर हितसंबंध जपणे हेदेखील अनेक राजकारण्यांमध्ये पाहायला मिळते. असाच काहीसा प्रत्यय आज बेळगाव विमानतळावर आला. निमित्त होतं ते माजी मंत्री डी. बी. इनामदार यांच्या अंत्यसंस्काराच्या विधीचे!
माजी मंत्री डी. बी. इनामदार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री सिद्धराम्मय्या यांच्यासह अनेक मंत्रिमहोदयांनी उपस्थिती लावली. डी. बी. इनामदार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतल्यानंतर बेळगाव विमानतळावर सर्व मंत्रीमहोदय आमने सामने आले.
तोंडावर निवडणूक आली असता हे दोन्ही राजकारणी एकमेकांशी सौहार्दपूर्ण पद्धतीने बोलले. यावेळी मल्लिकार्जुन खर्गदेखील उपस्थित होते. आमने सामने आलेल्या मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांनी एकमेकांची विचारपूस केली. आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराची चौकशीही केली.
यावेळी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाता जाता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या पाठीवर थाप दिली आणि हि छबी कॅमेऱ्यात कैद झाली. या छायाचित्राची चर्चा आज समाजमाध्यमात चवीने रंगवली गेली. आणि आपापसात भांडणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही एक वेगळाच संदेश देऊन गेली, हे विशेष…..!