बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीचे खानापूर तालुक्याचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.
आज शिवसेनेच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर पाठिंब्याचे पत्र पाठविण्यात आले असून यामध्ये, आजवर ज्यापद्धतीने कर्नाटकातील मराठी सीमाबांधवांच्या पाठीशी एकजुटीने सर्व शक्तीनिशी उभा राहिला आहे. आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदार संघातून पक्षातर्फे के. पी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
परंतु मराठी सीमावासियांच्या एकीला ग्रहण लागू नये याकरिता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार पक्षाच्या उमेदवाराने माघार घेऊन समिती उमेदवार मुरलीधर पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. परंतु काही कारणास्तव के.पी. पाटील यांनी माघार न घेतल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
के. पी. पाटील हे कर्नाटक राज्य शिवसेना पक्षाच्या उपाध्यक्षपदी नसून त्यांच्या उमेदवारीचा शिवसेनेशी कोणताही संबंध नाही.
मराठी माणसाच्या एकजुटी करिता शिवसेना पक्षाचा समितीचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात येत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.