Monday, January 27, 2025

/

मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचा प्रचार करावा; खा. राऊत यांचे आवाहन

 belgaum

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झाली असून सीमाभागात एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा असे आमचे ठरले आहे. तेंव्हा खरोखर हिम्मत असेल अस्मिता असेल तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील समिती उमेदवारांचा प्रचार करावा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

मुंबई येथे पत्रकार आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी मी स्वतः येत्या 3 व 4 मे रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी बेळगाव सीमा भागात जात आहे. काल या संदर्भात माननीय शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. आज सकाळी उद्धव ठाकरे साहेबांशी चर्चा झाली आहे.

एकजुटीने महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार करायचा असे आमचे ठरले आहे अशी माहिती देऊन यावेळी कधी नव्हे ती महाराष्ट्र एकीकरण समिती एकसंध झाली आहे. त्यांच्यात कोणतेच मतभेद दिसत नाहीत. फाटाफूट दिसत नाही. त्यामुळे मला खात्री आहे की यावेळी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार असतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

 belgaum

बेळगावच्या आंदोलनात भाग घेतला, तुरुंगात गेलो असे म्हणणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझे आवाहन आहे की ही खरी वेळ आहे. यावेळी त्यांनी सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला यावे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही समितीच्या प्रचारासाठी बेळगावला यायला हवे.

आपण जर मराठी माती, मराठी माणसं यांचे देणे लागत असाल तर आणि तुमच्यात खरोखर हिम्मत असेल, अस्मिता असेल तर शिंदे आणि फडणवीस या दोघांनी आमच्याबरोबर एकीकरण समितीच्या, मराठी माणसाच्या प्रचारासाठी बेळगावात पुढील 8 दिवसात यायला हवं.

त्यांनी तसेच जाहीर करावं अन्यथा त्यांचा महाराष्ट्र एकीकरण समिती आणि बेळगाव सीमा भागाशी काही संबंध नाही. त्यांनी उगाच तुरुंगात गेल्याचे खोटे दाखले देऊ नयेत, असे परखड मत देखील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.