भारतीय जनता पक्ष देशाला लुटत आहे. आज प्रधानमंत्री मोदींचे मित्र मालामाल होत आहेत तर दुसरीकडे देश बेहाल होत आहे, अशी टीका करून भाजपने पराभव पचवायला शिकले पाहिजे जे आता त्यांना कर्नाटकात शिकावं लागेल. मोदींच्या लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनच्या बाबतीतील शंका दूर करावी अथवा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे आव्हान आम आदमी पक्षाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री भगतसिंग मान यांनी दिले.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बेळगाव दौऱ्यावर आले असता आज बुधवारी सकाळी सांबरा विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री मान म्हणाले की, येत्या 10 मे रोजी कर्नाटक विधानसभेची निवडणूक आहे आणि योगायोगाने आम आदमी पार्टीला (आप) नुकताच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर आमची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. पंजाबमध्ये देखील पोटनिवडणूक होत आहे. काल मी हुबळी व अन्य विधानसभा मतदारसंघात गेलो होतो. तेथील आम आदमी पार्टीच्या रोड शोमध्ये लोक स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोक स्वतःहून तुमच्याकडे येतात याचा अर्थ ते जुन्या यंत्रणेला कंटाळले आहेत, त्यांना आता नवी कथा लिहायची आहे असा होतो. हुबळी वगैरे ठिकाणी काल मला अगदी पंजाब सारखे वातावरण दिसले. आम आदमी पार्टी हा इमानदार पक्ष आहे. अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानावरून एका छोट्या समूहाच्या स्वरूपात सुरू केलेला हा पक्ष आज राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष बनला आहे असे सांगून त्यांनी आपल्या पक्षाबद्दल माहिती देताना आप हा सध्याच्या घडीला देशातील वेगाने वाढणारा राजकीय पक्ष आहे असे सांगितले.
भाजपवर कडाडून टीका करताना देशात भाजपकडून लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप आपल्या स्वार्थासाठी दुधारी कार्यक्रम राबवत आहे. म्हणजे एखाद्या राज्यातील सार्वत्रिक निवडणूक जिंकली तर ठीकच अन्यथा त्याच राज्यात पोटनिवडणूक घडवून आणायची. त्यासाठी काँग्रेस सारख्या पक्षातील आमदार फोडायचे. त्या आमदारांना राजीनामा द्यायला सांगून त्यानंतर पोटनिवडणूक घ्यायची हे भाजपचे तंत्र आहे. सत्ता मिळवण्याची यांना इतकी घाई असते की हे पहाटे तीन-चार वाजता राज्यपालांना उठवून शपथविधी पार पाडतात. जर पोट निवडणुकीत देखील यश मिळाले नाही तर दुसरा पर्याय म्हणजे राज्यपालांकरवी त्रास देणे. सध्या पंजाब, बंगाल, तामिळनाडू या ठिकाणी हाच प्रकार सुरू आहे. लोकशाहीत निवडक लोक नव्हे तर निवडून आलेले लोक निर्णय येत असतात. एकंदर जेथे आपले सरकार नाही तेथील सरकारला त्रास देणे एवढेच काम भाजप करते.
भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जुमला पार्टी आहे. ते फक्त एकावर एक इमले बांधतात आणि ऐकवतात असे सांगून पंजाबमध्ये सत्तेवर आल्यानंतर आम आदमी पार्टीकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती मुख्यमंत्री मान यांनी पत्रकारांना दिली. बेळगाव आणि पंजाब यांच्यात साम्य असलेली सर्वात मोठी बाब म्हणजे उसाचा दर हे होय. एक वर्षांपूर्वी पंजाबमध्ये देखील इथल्या सारखीच परिस्थिती होती. शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळत नव्हता. उसाचे बिल कायद्यानुसार 14 दिवसात मिळाले पाहिजे परंतु ते वर्षानुवर्षे मिळत नव्हते. मात्र सत्तेवर आल्यानंतर आपने सर्वप्रथम 392 कोटी रुपये इतकी ऊसाची थकीत बिल अदा केली. आज उसाला प्रतिक्विंटल 380 रु. इतका सर्वाधिक दर पंजाबमध्ये दिला जात असल्यामुळे शेतकरी खुश आहेत, असे त्यांनी सांगितले. भाजप सरकारच्या छत्रछायेखाली देशात सुरू असलेल्या भ्रष्टाचारावर जोरदार टीका करताना मुख्यमंत्री मान यांनी आज मंत्र्यांच्या घरात नोटा मोजण्याची यंत्र सापडू लागली आहेत ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे सांगितले. भाजप देशाला लुटत आहे. आज मोदींचे मित्र मालामाल होत आहेत दुसरीकडे देश बेहाल होत आहे. आम आदमी पार्टीचे पक्षाचिन्ह झाडू हे आहे आणि झाडूचे काम कचरा साफ करणे हे आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आम्ही तेच करत आहोत असे सांगून निवडणूक सर्वेक्षणाबाबत बोलताना आम्ही सर्वेक्षणामध्ये येत नाही थेट सरकारमध्ये येतो असे मुख्यमंत्री भगतसिंग मान मिश्किलपणे म्हणाले. तसेच भाजपने पराभव पचवायला शिकले पाहिजे. जे आता त्यांना कर्नाटकात शिकावं लागेल. मोदींच्या लाटेवर भाजपचा विश्वास असेल तर त्यांनी आणि निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनच्या बाबतीतील शंका दूर करावी अथवा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे, असे आव्हान त्यांनी दिले.
याप्रसंगी बेळगाव उत्तर मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे अधिकृत उमेदवार राजकुमार टोपणन्नावर यांच्यासह आपची इतर नेतेमंडळी आणि पदाधिकारी उपस्थित होते. सांबरा विमानतळावर आज सकाळी मुख्यमंत्री भगतसिंग मान यांचे आगमन होताच शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.