बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून बेळगाव उत्तर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक लढवीत असलेले ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज रामलिंग खिंड गल्ली येथे करण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्याहस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी सीमा आंदोलनातील हुतात्म्यांच्या प्रतिमेला रामा शिंदोळकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्याहस्ते पूजन करण्यात आले. बी. ओ. येतोजी आणि प्रकाश मरगाळे यांच्याहस्ते दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी अमर येळ्ळूरकर यांनी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका केली. बेळगावमध्ये समिती निवडून आली तर विकास होत नाही, असे सांगितले जाते. मात्र सत्तेत असलेल्या भाजपने बेळगावचा नेमका कुठं आणि कसा विकास केला हे ठामपणे सांगावे असे आव्हान दिली. स्मार्ट सिटी, अमृत योजना, एसएससी अशा विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि खर्चही झाला. मात्र केवळ सिमेंटीकरण आणि काँक्रीटीकरण करून बेळगावच्या जनतेला विकासाच्या नावावर तोंडाला पाने पुसण्यात आली.
बेळगावकरांच्या हक्काच्या पैशांवर भ्रष्टाचार करून भाजपने डल्ला मारला. विकास, धार्मिक तेढ आणि भाषिक मुद्द्यावरून राजकारण करून बेळगावमधील जनतेत फूट पाडली. मराठीच्या मुद्द्यावरून मराठी तरुणांची दिशाभूल केली. अनेक तरुण राष्ट्रीय पक्षांच्या प्रवाहात भरकटले आहेत. मात्र आज बेळगावमध्ये मराठी जिवंत ठेवण्याचे काम केवळ समितीने केले आहे, हे विसरून चालणार नाही, असे ते म्हणाले.
आज बेळगावमधील मराठी भाषिक स्वाभिमानाने मराठी बोलतो, जगतो हे केवळ समितीमुळे शक्य आहे. नाही तर कर्नाटक सरकारची एजंटगिरी करणाऱ्या नेत्यांसमोर कधीच नतमस्तक व्हायची वेळ आली असती, असे परखड विचार देखील येळ्ळूरकर यांनी मांडले.
बेळगावमधील दोन मतदार संघात ज्यापद्धतीने मराठी समाजातील नेत्यांना उमेदवारीपासून डावलण्यात आले यावरून कर्नाटकातील राष्ट्रीय पक्षांचा कुटील डाव लक्षात येतो. मराठी जनता आता गप्प बसणार नाही. हि निवडणूक भाषा आणि विकासाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण समिती लढत आहे. यामुळे राष्ट्रीय पक्षांची कुटील कारस्थाने हाणून पाडायची असतील तर आगामी निवडणुकीतून मराठी भाषिकांनी प्रत्त्युत्तर देणे गरजेचे आहे असे अमर येळ्ळूरकर यांनी सांगितले.
यावेळी नेताजी जाधव ,मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, रेणू मुतगेकर, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, शिवाजी मंडोळकर, रवी साळुंखे, बिदर येथील कार्यकर्ते आदींसह म. ए. समितीचे कार्यकर्ते, महिलावर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पियुष हावळ यांनी केले.