बेळगाव लाईव्ह : १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा शेवटचा दिवस होता. गुरुवारी तब्बल १३१ जणांनी अर्ज दाखल केले असून एकूण उमेदवारांची संख्या ३०६ वर पोहोचली होती. शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी अर्जाची छाननी करण्यात आली. छाननी नंतर एकूण २२२ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारपर्यंत ३०६ उमेदवारांकडून ३६० अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत २५ जणांचे अर्ज रद्दबातल ठरविण्यात आले असून सोमवार दि. २४ रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. निपाणी मतदारसंघातून गुरुवारी ९, चिकोडी मधून ६, अथणी मधून ४, कागवाड मधून ५, कुडची मधून ८ , रायबाग मधून ६, हुक्केरी मधून ५, अरभावी मधून ८, गोकाक 10,
यमकनमर्डी मधून ८, बेळगाव उत्तर मधून १५, बेळगाव दक्षिण मधून ९, बेळगाव ग्रामीण मधून १३, खानापूर मधून ६, कित्तूर मधून ८, बैलहोंगल मधून १, सौंदत्ती मधून ३, रामदुर्ग मधून ७ असे अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस असल्यामुळे अनेकांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
राजकीय पक्षांसह उमेदवार आणि प्रशासनानेही निवडणुकीची आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून जिल्ह्यातील ३८,३३,०३७ हून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. यंदा नव्या मतदारांची सर्वाधिक नोंद बेळगाव जिल्ह्यात झाली असून ७९ हजारहून अधिक युवा मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. एकूण ४,४३४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी काऊंटडाऊन सुरु झाले आहे.