राजकीय भवितव्य पहात माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते लक्ष्मण सवदी काँग्रेस पक्षात जात असल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजी व्यक्त करून काँग्रेस पक्षाकडे 60 हून अधिक मतदार संघासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे ते इतर पक्षातील नेत्यांची भरती करून घेत आहेत, असे सांगितले.
बेंगळूर येथे आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, काँग्रेस पक्षाला भवितव्य नाही आणि अशा पक्षांमध्ये लक्ष्मण सवदी यांनी प्रवेश करणे हे खेदजनक आहेच, शिवाय काँग्रेस पक्षाकडे स्वतःचे कणखर उमेदवार नसल्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेत्यांना ते आपल्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
सत्ताधारी पक्षाकडे इच्छुकांची संख्या जास्त असते हे सर्वसामान्य आहे. आमदार होण्यासाठी त्यांच्यापैकी काहींनी पक्ष त्याग केला आहे. मात्र पक्ष कार्यकर्ते आमच्या समवेत आहेत. आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप प्रचंड बहुमताने विजयी होईल असे स्पष्ट करून अधिकृत उमेदवार यांची दुसरी यादी यापूर्वी जाहीर करण्यात आली आहे.
आता तिसरी यादी लवकरच जाहीर केली जाईल. मी स्वतः उद्या शनिवारी शिग्गावमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.