‘कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव ग्रामीण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून आर. एम. चौगुले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. बेळगाव तालुका म. ए. समितीच्या 129 सदस्यीय निवड समितीने लोकशाही पद्धतीने पारदर्शक निवड प्रक्रिया राबवून समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून चौगुले यांची सर्वानुमते निवड केल्याचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी आज बुधवारी दुपारी जाहीर केले.
विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर म. ए. समितीने विविध मतदारसंघातील उमेदवार निवडीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीकडून गेल्या रविवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर आज बुधवारी अंतिम उमेदवार निवडीसाठी मराठा मंदिर येथे निवड समितीच्या 129 सदस्यांची बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत लोकशाही मार्गाने निवड प्रक्रिया राबवून इच्छुक उमेदवारांमधून आर. एम. चौगुले यांची समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. आज उमेदवार निवड प्रक्रिया सुरू असताना कोणाचे नांव जाहीर होणार? याची उत्सुकता लागल्याने कार्यकर्त्यांनी मराठा मंदिर बाहेर गर्दी केली होती.
उमेदवार निवडी संदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील म्हणाले की, बेळगाव ग्रामीण मतदार संघातून समितीचा उमेदवार निवडण्यासंदर्भात गेल्या 2 एप्रिल रोजी बैठक घेण्यात आली होती. सदर बैठकीत सुमारे 200 कार्यकर्त्यांची हजेरी होती. त्यावेळी कांही निकष लावून उमेदवार निवडण्याचे ठरले. उमेदवार निवडीसाठी त्याच बैठकीत निवड प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यानुसार गेल्या 3 ते 7 एप्रिलपर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार समितीकडे 5 अर्ज आले होते. त्यानंतर रीतसर परवानगीने इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवाराची निवड पारदर्शक व लोकशाही मार्गाने व्हावी, यासाठी आज बुधवारी निवड समितीच्या 129 सदस्यांची बैठक घेण्यात आली.
या बैठकीमध्ये लोकशाही मार्गाने निवड प्रक्रिया करून आर. एम. चौगुले यांची सर्वानुमते अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवड समितीच्या सर्व 129 सदस्यांनी त्याचप्रमाणे कायदे सल्लागार ॲड. प्रसाद सडेकर, ॲड. सतीश बांदिवडेकर, ॲड. नारायण खणगांवकर आणि ॲड. श्याम पाटील यांनी आपल्याला उत्तम सहकार्य केल्याचे सांगून ॲड. एम. जी. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.