देशातील विमानतळांच्या प्रवासी संख्येची आकडेवारी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) नुकतीच जाहीर केली असून त्यानुसार बेळगाव विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत मागील महिन्यांच्या तुलनेत गेल्या मार्चमध्ये 12.17 टक्के वाढ झाली आहे.
बेळगावची विमानसेवा एकीकडे कमी होत असतानाही प्रवाशांचा प्रतिसाद मात्र उत्तम मिळत आहे. मोठ्या महानगरांना सेवा उपलब्ध नसल्या तरी टू -टायर व थ्री -टायर शहरांना बेळगावमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव विमानतळावर मार्चमध्ये एकूण 18 हजार 343 प्रवाशांची नोंद झाली आहे. बेळगाव विमानतळावरून गेल्या जानेवारीमध्ये 16,637 फेब्रुवारी 16352 आणि मार्चमध्ये 18343 प्रवाशांनी प्रवास केला आहे. यासह बेळगाव विमानतळ हे राज्यातील सर्वाधिक वर्दळीचे तिसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे.
गेल्या जानेवारी, फेब्रुवारी पेक्षा मार्च महिन्यातील प्रवाशांची वाढलेली टक्केवारी लक्षात घेता बेळगावच्या विमान फेरा वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, म्हैसूर, नाशिक, कडप्पा चेन्नई या प्रमुख शहरांच्या विमानसेवा बंद होऊन देखील बेळगावची प्रवासी संख्या मात्र थोड्या प्रमाणात का होईना वाढताना दिसत आहे.
विमानांची संख्या कमी झाल्याने उद्योग, व्यापार क्षेत्रावर मोठा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या शहरांना पोहोचण्यासाठी हैदराबाद बेंगलोर अथवा गोवा येथून प्रवास करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे बेळगावमधील बंद झालेल्या विमानसेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.