बेळगाव लाईव्ह : उमेदवारी जाहीर करण्यात आघाडीवर असलेल्या काँग्रेसने आणखी ७० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून उर्वरित ३० उमेदवार निश्चित होणे बाकी आहे.
एकूण २२४ उमेदवारांच्या यादीतील पहिली १२४ उमेदवारांची यादी २५ मार्च रोजी काँग्रेसने जाहीर केली आहे. उर्वरित १०० उमेदवारांची दुसरी यादी ९ एप्रिलनंतर जाहीर होण्याची शक्यता असून, काही उमेदवारांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी, यासाठी दबाव आणला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
आज बेंगळुरू येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, ए. के. अँटोनी, अंबिका सोनी, डॉ. गिरीश व्यास यांच्यासह काँग्रेसचे कर्नाटक अध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, बी. के. हरिप्रसाद, प्रचार समितीचे अध्यक्ष एम. बी. पाटील, माजी उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राज्यातील १०० उमेदवारांची यादी आपण तयार करत असून यासंदर्भात काही ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत.
तर काही ठिकाणी तडजोड करून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हायकमांडने अनुमती दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी ९ किंवा १० एप्रिल रोजी जाहीर केली जाणार आहे असे ते म्हणाले.