बेळगाव लाईव्ह : जागतिक महिला दिन म्हणून ८ मार्च हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. परंतु महिलादिनाची खरी व्यापकता अजूनही निर्माण झालेली पाहायला मिळत नाही, हि मोठी खंत आहे. आजच्या दिवशी अनेक थोर, वीर शूरांगणांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून नारीशक्तीचा सन्मान केला जातो. सत्कार आणि सोहळे साजरे केले जातात. परंतु एकाच दिवशी स्त्रियांचा सन्मान करून महिला दिनाचे महत्व साध्य होते का? हा प्रश्न अनुत्तरित आहे
आजही अनेक असंख्य प्रश्न महिलांसमोर आवासून उभे आहेत. ज्यांची उत्तरे शोधण्यासाठी क्वचितच महिला पुढे सरसावतात. आजही महिलांवरील अन्यायाचा, अत्याचाराचा पाढा कमी झालेला नाही. स्त्रीभ्रूणहत्येसारखा ज्वलंत प्रश्न आजही आपल्यासमोर उभा आहे. समाजातील स्त्रियांचे स्थान आणि देव्हाऱ्ह्यात पुजल्या जाणाऱ्या देवीचा मान यातील अंतर जसेच्या तसे आहे. स्त्रियांच्या कमकुवतपणाचे दाखले देत समाज धन्यता मनात आहे. अशावेळी महिलांनीच आपल्या सन्मानाचा मार्ग शोधणे आवश्यक आहे.
जाहिराती असोत किंवा मालिकाविश्व, या साऱ्या गोष्टींमध्ये स्त्रियांचा वापर करण्यात येतो. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीलाचे दुःख समजू शकते, जाणीव ठेवू शकते असे मानले जाते. परंतु अलीकडे मालिकांमध्ये स्त्रियांचे चित्रण हे भयाण दर्शविण्यात येते. सततच्या कुरघोड्या करणाऱ्या स्त्रिया, टवाळखोर, मूर्खपणा सिद्ध करणाऱ्या स्त्रिया अशा पद्धतीचे चित्रण आजकाल मालिकांमध्ये दाखविले जाते.
आणि स्वतःचेच असे चित्रण महिलावर्गातून चवीने पहिले जाते. स्त्रियांवरील सोशल मीडियावरील विनोद असोत, किंवा नात्यांमध्ये स्त्रियांची भूमिका असो, अशा अनेक गोष्टींमध्ये स्त्रियांनाच लक्ष्य केले जाते. या गोष्टीसाठी कुठेतरी स्त्रियाही जबाबदार आहेत, असे वाटते.
महिलांमधील सुप्त कलागुणांना आज विविध पातळीवर वाव दिला जातो. मात्र अनेक स्त्रियांना स्वतःची क्षमता आणि कर्तृत्व कित्येकवेळा जाणवत नाही. इंटरनेटच्या जमान्यात विज्ञानाची सोबत असूनही आज २१व्या शतकात देखील महिलांची प्रगती खुंटली आहे. अनेक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या स्त्रियाही आहेत. मात्र अनेक तळागातील स्त्रिया प्रगतीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, हे दुर्दैव आहे.
महिला सबलीकरणाचा मुद्दा आज अनेक ठिकाणी मांडण्यात येतो. परंतु कार्यक्रम आणि भाषण संपले कि हे मुद्दे आपोआप पडद्याआड जातात. यासाठी महिलांनी महिलांच्या सबलीकरणासाठी पंचसूत्रीचा अवलंब करण्याची गरज आहे. सक्षमीकरण, आर्थिक साक्षरता, स्वसंरक्षण, स्वावलंबन आणि संघटन अशा पंचसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपला मार्ग निवडणे गरजेचे आहे. स्वतःचे आर्थिक निर्णय स्वतः घेणे, आर्थिक स्वावलंबी होणे, अर्थार्जनासाठी योग्य पर्याय निवडून स्वतःच्या पायावर उभं राहणे, स्वाभिमान आणि संघर्षाच्या प्रवासातून स्वतःच अस्तित्व सिद्ध करणे हे स्त्रियांच्याच हाती आहे.
आपण देव्हाऱ्यातल्या आदिशक्तीचा जागर करतो. परंतु आपल्याच कुटुंबातील गृहलक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. देव्हाऱ्यातल्या देवापेक्षा स्त्रीचे महत्व नक्कीच मोठे आहे. आदिशक्तीच्या विविध स्वरूपाचे पूजन केले जाते मात्र गृहलक्ष्मी नेहमी दुर्लक्षित राहते, हि दुर्दैवी बाब आहे. या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार करून महिलांनीच आपल्या प्रगतीसाठी अंतर्मुख होणे आवश्यक आहे.