बेळगाव लाईव्ह : राज्यात निवडणूक असो किंवा आणखीन कोणतेही कारण सातत्याने अधिकाऱ्यांच्या बदलीचे सत्र राबविले जाते.
जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यासह अनेक अधिकाऱ्यांना बदली सत्राला सामोरे जावेच लागते. मात्र ग्रामपंचायतीतील पंचायत विकास अधिकारी या बदली सत्रातून वगळले जातात. याचे नेमके कारण काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
अनेक गावातील राजकारणात पंचायत विकास अधिकाऱ्यांचादेखील महत्वपूर्ण सहभाग असल्याचे अनेकवेळा निदर्शनात आले आहे. विविध गावातील ग्रामस्थांचे, पंचायत सदस्यांचे पंचायत विकास अधिकाऱ्यांशी सूत जुळत नाही.
कित्येकवेळा पंचायत विकास अधिकाऱ्यांवर आरोप करत त्यांची बदली करण्याची मागणी केली जाते. परंतु जवळपास १५ वर्षांहून अधिक काळापर्यंत एकाचठिकाणी पंचायत विकास अधिकारी खुर्चीला चिकटून असतात.
अनेक पंचायत विकास अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार आणि लाचखोरी प्रकरणात नागरिकांनी पकडले आहे. मात्र त्यांना ना बदलीची भीती आहे ना जनतेच्या तक्रारींची ना सरकारची! त्यामुळे पीडीओंची बदली सरकारी नियमानुसार करता येणे शक्य आहे कि नाही? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
एकाच ठिकाणी दीर्घकालावधीपासून कार्यरत असणाऱ्या पंचायत विकास अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.