बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील पाणीपुरवठ्याचे तीनतेरा वाजले असून अनेक ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून पाणी वाया जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून अलारवाड ब्रिज जवळ जुन्या बेळगाव नाक्याकडून अलारवाड व कुडचीला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिनीला गळती लागल्याचा प्रकार घडला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून या जलवाहिनीला गळती लागली असून कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे याकडे गंभीर दुर्लक्ष झालेले पाहायला मिळत आहे.
दररोज हजारो लिटर पाणी याठिकाणी वाया जात असून एचटीसी प्लाण्टला जाणाऱ्या कार्पोरेशनचे सांडपाण्याच्या पाईपलाईन घालण्याच्या कामकाजादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याचे सांगण्यात येतंय.
बेळगावमधील नागरिक पाणी टंचाईची समस्या झेलत असून अशापद्धतीने वाया जाणाऱ्या पाण्याकडे मनपा अधिकारी आणि कंत्राटदार कधी लक्ष देणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.