बेळगाव लाईव्ह : ब्रिटिशांच्या काळात शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन व्यर्थ आहे ही कल्पना आपल्याकडे रुजू झाली. हळूहळू स्त्री शिक्षणाचाही पाया अनेक दगड-धोंडे झेलत सावित्रीबाईंनी रोवला. तळागाळातील महिलांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी नंतर अनेक संघटना पुढे आल्या.
पाहता पाहता स्त्री शिक्षणाचे महत्व वाढत गेले आणि आज शिक्षण क्षेत्रातील महत्वाच्या पदांवर अनेक महिलांना स्थान मिळाले. अक्षरांचा श्रीगणेशा करणाऱ्या महिला आज विविध क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रमामध्ये पारंगत झाल्या. अशा सावित्रीच्या लेकींमुळे आज शिक्षण क्षेत्रदेखील विस्तारले आहे. डॉ. वृषाली कदम यादेखील अशा महिलांपैकी एक.
कर्नाटकामध्ये लोकसाहित्याविषयी मराठीतून अभ्यास करणारे लोक खूप कमी आहेत. अलीकडच्या काळात काही लोकसाहित्यावर मराठीतून अभ्यास केला जात आहे. अशा लोकसाहित्याचे एक अभ्यासक म्हणून डॉ. वृषाली कदम यांचे नाव घेतले जाते. डॉ. वृषाली कदम यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव तालुक्यातील मन्नूर गावातील सरकारी मराठी मुला-मुलींची शाळा मन्नूर येथे झाले.
हायस्कूलचे शिक्षण हिंडलगा हायस्कूल हिंडलगा येथे झाले. पदवीचे शिक्षण भाऊराव काकतकर महाविद्यालयातून पूर्ण केले आहे. B.Ed. चे शिक्षण क्रांतिवीर संगोळी रायण्णा शिक्षण महाविद्यालयातून झाले आहे. तर मराठी विषयातून एम.ए. आणि एम. फील. चे शिक्षण कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे पदव्युत्तर केंद्र असलेल्या बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा पदव्युत्तर केंद्रातून त्यांनी पूर्ण केले आहे. त्या K-SET ही परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. डॉ वृषाली विलास कदम यांनी बेळगाव जिल्ह्यातील मराठी लोकसाहित्याचा अभ्यास या विषयावर संशोधन करून राणी चन्नम्मा विद्यापीठाची डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या मराठी विभागातील ही पहिलीच पीएच.डी आहे. सदर पीएच.डी च्या अभ्यासासाठी मार्गदर्शक म्हणून मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.चंद्रकांत वाघमारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या अभ्यास दरम्यान बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक समाजाच्या लोकपरंपरा, चालीरीती, सणउत्सव, देवदेवता, विविध विधी, लोकसमजुती, लोकगीते, लोककथागीते, लोककथा, लोककला, म्हणी, वाक्यप्रचार, उखाणे यांचे अभ्यासपूर्ण संशोधन त्यांनी केलेले आहे. डॉ. वृषाली कदम यांचे बालपण मन्नूर या छोट्याशा गावात गेल्यामुळे तेथील भाषा, लोक, परंपरा त्यांनी जवळून पाहिलेल्या आहेत. विविध लोकसाहित्य प्रकारांशी त्यांचा जवळून संबंध आलेला आहे. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील लोकसाहित्याच्या क्षेत्रात अजूनही खूप काही करण्याचा त्यांचा मानस आहे.
आपला हा मौल्यवान ठेवा जपून ठेवण्यासाठी या क्षेत्रात त्या आजही कार्यरत आहेत. त्यामुळे लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून त्या ओळखल्या जातात. लग्नानंतर शिक्षण न थांबवता शिक्षणाचा प्रवास त्यांनी सासरच्या सहकार्यामुळेच पूर्ण केलेला आहे. याच दरम्यान पीएच.डी. च्या संशोधनावेळी त्यांचे पती व बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश महेश दड्डीकर यांची लोकसाहित्याच्या संकलन कार्यात मोलाची साथ लाभली. सदर अभ्यासाच्या निमित्ताने बेळगाव जिल्ह्यातील भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन होण्यासाठी मोलाची मदत झाली.
याशिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध विविध नियतकालिकातून प्रसिद्ध झाले असून त्यांनी विविध राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून शोधनिबंधांचे वाचन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील डॉ. वृषाली कदम यांनी मारलेली मजल हि खरोखरच कौतुकास्पद अशी आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ‘बेळगाव लाइव्ह’च्या खूप साऱ्या शुभेच्छा!