बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे खूप आधीपासूनच वाहायला लागले होते. प्रत्येकाला केवळ या निवडणुकीच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा होती. दरम्यान निवडणूक आयोगाने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली असून आता राजकीय हालचाली युद्धपातळीवर सुरु आहेत. ज्यांच्या जीवावर सत्तेची स्वप्ने रंगविली जातात, त्या मतदार राजाला आता सोन्याचे दिवस आले आहेत.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर केवळ ४५ दिवस निवडणुकीला बाकी राहिले असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत मतदाराला अनन्य साधारण महत्व दिले जाणार आहे. एरव्ही मतदाराच्या मागणीला केराची टोपली दाखविणाऱ्या राजकारण्यांना आता मतदाराची प्रत्येक गोष्ट आवर्जून, लक्षपूर्वक पाळावी लागणार आहे. परंतु हे नात्यासत्र केवळ आगामी ४५ दिवसांपुरतेच मर्यादित राहणार असून उर्वरित ४ वर्षे १० महिन्यांचा काळ हा राजकारण्यांच्या ढोंगीपणाचाच असणार आहे.
सत्तेवर येण्यासाठी मतदाराचे अगदी पायदेखील धरणारे राजकारणी निवडणुकीच्या निकालानंतर मतदारांची ओळख देखील ठेवणार नाहीत, हेदेखील तितकेच सत्य आहे. सध्या मतदारांना विविध आश्वासने देत, विविध आमिषे दाखवत मतदारांना उच्च स्थानावर बसविले जात आहे. मतदारांचा जयघोष होत आहे, त्यांच्याबद्दल अचानक प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, काळजी या सर्व गोष्टी उतू जात आहेत.
हा सर्व ‘ड्रामा’ पुढील चार-साडेचार वर्षात पाहायला मिळणार नाही! निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पुन्हा महागाई, आरक्षणाच्या भूलथापा, सोयी-सुविधांची आश्वासने, राजकीय स्वार्थासाठी होणारे महापुरुषांचे अवमानसत्र, कराचा वाढता बोजा, जाचक अटी-नियम अशा अनेक गोष्टी ‘ये रे माझ्या मागल्या’ प्रमाणेच सुरु राहणार आहेत.
तोवर पुढील ४५ दिवस मतदारांनी आपली सेवा करून घ्यायची संधी अजिबात दवडू नये, शिवाय या निवडणुकीत आपला ‘जागरूक’पणा नक्कीच राजकारण्यांना दाखवावा, स्वाभिमानाला जागून मतदान करावे, आणि आपले महत्व अबाधित राखावे, इतकीच माफक अपेक्षा!