बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत विकासकामांच्या उद्घाटनाचा सपाटा बेळगावमध्ये सुरू होता. आपापल्या मतदार संघात विकासकामांची माहिती देणारे, राष्ट्रीय पातळीवरील मंत्री-मान्यवरांना खुश करण्यासाठी, त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेले, स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांची छायाचित्रे असलेले फलक लावण्यात आले होते. मात्र बुधवारी आचारसंहिता लागू झाल्यामुळे सदर फलक झाकून ठेवण्यात आले आहेत. तर शहरातील खासगी इमारतींवरील राजकीय फलक हटविण्याची मोहिमही सुरू झाली आहे. असे फलक असलेल्या इमारत मालकांवर गुन्हा नोंद केला जात आहे.
निवडणूक जाहीर होताच शहरातील सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले फलक हटविण्यासाठी व ते झाकून ठेवण्यासाठी महापालिकेचे अधिकारी रस्त्यावर उतरले. या मोहिमेत महापालिकेच्या अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, आरोग्याधिकारी डॉ. संजय डूमगोळ, महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी यांचा समावेश होता. गोवावेस येथील बहुचर्चित खाऊ कट्टा या ठिकाणचे राजकीय फलक झाकण्यात आले.
गेल्या पाच वर्षांत शहरात ज्या-ज्या ठिकाणी विकासकामे झाली आहेत, त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, मंत्र्यांचे छायाचित्र असलेले फलक प्राधान्याने झाकण्यात आले. त्याची माहितीही तातडीने महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांना देण्यात आली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांत राजकीय पक्षांच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक नेत्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्थानिक नेत्यांनी शहरभर स्वागत फलक लावले होते.
महापालिकेकडून शहरातील अन्य फलक हटविण्यात आले. काही हटविता न येणारे फलक झाकण्यात आले आहेत. ते फलक हटविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. पण राजकीय फलक हटविले गेले नाहीत, अशी तक्रार होत होती. मात्र, आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे महापालिकेला सर्वच फलक हटवावे लागले आहेत.