कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून येत्या 10 मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये राज्यभरातील 5,24,11,557 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून यासाठी राज्यभरात 58,282 मतदान केंद्रांची स्थापना केली जाणार आहे. याखेरीज निवडणूक संदर्भात गेल्या 27 मार्चपर्यंत राज्यभरात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू, कुकर साड्या वगैरे आमिषाच्या वस्तू यांच्या स्वरूपात एकूण 57,72,35,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणूक -2023 साठी राज्यातील
2,63,78,462 पुरुष, 2,60,28,344 महिला आणि 4,751 तृतीयपंथी मतदार असे एकूण 5,24,11,557 मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये 47,609 सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील (सर्व्हिस व्होटर्स) समावेश असणार आहे. याखेरीज परदेशात असलेले 2151 पुरुष 869 महिला आणि एक तृतीयपंथी असे एकूण 3,021 मतदार मतदान करतील. मतदार यादीतील एकूण मतदारांमध्ये 9,58,806 युवा मतदार (18 ते 19 वर्षे), 12,15,142 वय वर्ष 80 आणि त्यावरील मतदार तसेच 5,60,908 पीडब्ल्यूडी मतदार असणार आहेत.
बेंगलोर शहर जिल्ह्यातील बेंगलोर दक्षिण (एसी 176) मतदारसंघ हा राज्यातील सर्वाधिक मतदारसंघ असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथी मिळून एकूण 6,77,247 मतदार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्वात कमी मतदार संख्या असलेला विधानसभा मतदारसंघ हा चिक्कमंगळूर जिल्ह्यातील शृंगेरी (एसी 123) हा मतदार संघ आहे. या मतदारसंघात स्त्री-पुरुष आणि तृतीयपंथी मिळून एकूण 1,68,564 मतदार आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात एकूण 58,282 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. यापैकी सर्वाधिक म्हणजे 4434 मतदान केंद्रे बेळगाव जिल्ह्यात असणारा असून सर्वात कमी म्हणजे 542 मतदान केंद्रे कोडगू जिल्ह्यात असतील. निवडणुकीसाठी निवडणूक निर्वाचन अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी, निवडणूक कर्मचारी वगैरे अशा एकूण 2,79,752 निवडणूक कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सध्या 3,51,153 कर्मचारी उपलब्ध आहेत.
याखेरीज 17,276 मायक्रो ऑब्झर्व्हर्स उपलब्ध आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात 2040 भरारी पथके आणि बेकायदेशीर घडामोडींवर पाळत ठेवणारी 2605 पथके कार्यरत आहेत. याखेरीज 266 व्हिडिओ तपासणी पथके 631 व्हिडिओ पाळत ठेवणारी पथके आणि 225 लेखा पथके देखील कार्यान्वित झाली आहेत. निवडणूक सुरळीत शांततेत पार पडावी यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यभरात 942 तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. या तपासणी नाक्यांपैकी 171 तपासणी नाके हे आंतरराज्य सीमेवर स्थापण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणुकीशी संबंधित फसव्या गैरप्रकारांना आळा घालण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. राज्य नोडल अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या मोहिमेद्वारे रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, बहुमूल्य धातू, कुकर -साड्या वगैरे सारखी अमिषं जप्त करण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. निवडणुकीशी संबंधित गेल्या 27 मार्चपर्यंत जप्त केलेला मुद्देमाल व रोख रक्कम पुढीलप्रमाणे आहे. पोलीस खाते : जप्त केलेला एकूण मुद्देमालाची किंमत रु. 34,36,39,451. यामध्ये रोख रक्कम रु. 14,24,47,841, अंमली पदार्थ 530 किलो, सोने 15 किलो, चांदी 135 किलो आणि 11,20,62,769 रुपये किमतीच्या आमिषाच्या वस्तू. अबकारी खाते :जप्त केलेला एकूण मालाची किंमत रु. 10,89,31,676. यामध्ये 6,84,54,606 रुपये किमतीची 138847 लिटर दारू आणि 43 किलो अंमली पदार्थ. आयकर विभागाकडून रोख 1,16,85,150 रुपये जप्त.
व्यावसायिक कर खात्याकडून एकूण 5,02,38,833 रुपये मूल्याची जप्ती. या पद्धतीने अन्य विभागांकडून देखील जप्तीची कारवाई करून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. एकंदर गेल्या 27 मार्चपर्यंत राज्यभरात रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ, मौल्यवान धातू, कुकर साड्या वगैरे आमिषाच्या वस्तू यांच्या स्वरूपात एकूण 57,72,35,315 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अबकारी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अबकारी खात्याकडून 4119 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.