बेळगावचे ज्येष्ठ सर्वोदयी व गांधीवादी कार्यकर्ते जलसंवर्धक शिवाजी कागणीकर यांना गदग तालुक्यातील नागाव येथील ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाच्यावतीने राज्यपालांच्या हस्ते ‘मानद डॉक्टर’ पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
गदगच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाचा तिसरा पदवीदान सोहळा राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या उपस्थितीत नुकताच दिमाखात पार पडला. या सोहळ्यात डॉक्टरेट आणि अन्य पदव्यांसह विद्यार्थी -विद्यार्थिनींना सुवर्णपदकं प्रदान करण्यात आली.
राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या पदवीदान सोहळ्यास कर्नाटक विज्ञान व तंत्रज्ञान अकादमीचे अध्यक्ष आणि इंफाॅल केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती सुबन्ना अय्यप्पन, ग्रामीण विकास व पंचायत राज विद्यापीठाचे कुलगुरू विष्णुकांत चटपल्ली, कुलसचिव प्रा. बसवराज लक्कण्णावर, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुशीला बी., अप्पर जिल्हाधिकारी एम. पी. मारुती आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर सोहळ्यात बेळगावचे ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. बेळगाव ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या शिवाजी कागणीकर यांचे सामाजिक कार्य तसेच प्रामुख्याने जल संरक्षण आणि संवर्धनासाठीचे अतुलनीय योगदान लक्षात घेऊन त्यांना ही डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. पदवीदान सोहळ्यात बोलताना राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी कृषीप्रधान भारत देशात शेती पद्धतीतील बदल ही काळाची गरज असल्याचे सांगितले.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जैविक शेती करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे अशा विद्यापीठातून कृषी विषयक शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचे ग्राम स्वराज्याचे स्वप्न साकार करावे असे आवाहनही राज्यपालांनी केले. सदर सोहळ्यास शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह सन्माननीय निमंत्रित व्यक्ती, पालक आणि विद्यार्थी -विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.