बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत असलेला सध्याचा विषय म्हणजेच राजहंसगड. राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकारण्यांनी जोरदार राजकारण सुरु केले असून यामुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
याव्यतिरिक्त मराठी मतांसाठी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरु असलेले राजकारण यावर अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आज ‘बेळगाव लाईव्ह’ शी बोलताना शिवसेना नेते संजय पवार यांनीही शिवाजी महाराजांवरून सुरु असलेले राजकारण आणि राजकारण्यांची मानसिकता यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. याचप्रमाणे राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले हे सर्व थोरपुरुष आपल्यासाठी देवासमान आहेत. यामुळे अशा थोर पुरुषांचा वापर राजकारणासाठी आणि मतांसाठी होऊ नये, याची दक्षता प्रत्येक राजकारणी नेत्यांनी घेणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून सुरु झालेले राजकारण थांबण्याची चिन्हे दिसत नसून एकाच मूर्तीचे दोनवेळा अनावरण करून मराठी भाषिकांवर छाप पडण्याचा खटाटोप राष्ट्रीय पक्षांनी केला असून याला महाराष्ट्रातील नेत्यांनीही खतपाणी घालण्याचे काम केले.
यामुळे सीमाभागात महाराष्ट्रातील नेत्यांविरोधात नाराजीचा सूर उमटत असून महाराष्ट्रातील नेत्यांकडून कर्नाटकची पाठ थोपटली जात असल्याचा आरोप सीमाभागातील जनता करत आहे.