शिव सन्मान पद यात्रेद्वारे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा सीमा भागात होणाऱ्या अवमानाची जनजागृती करणारे समिती नेते रमाकांत कोंडूस्कर यांच्या राजहंस गड या विषयावर संपर्क साधून बेळगांव live ने संवाद साधला.
येळ्ळूर राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोन दोनदा उद्घाटन होणे हा खुद्द शिवछत्रपतींचाच नव्हे तर बेळगावसह सीमाभागातील शिवभक्त आणि मराठी भाषिकांचा अवमान आहे. मात्र याची कल्पना असतानाही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजे भोसलेंसह महाराष्ट्रातील नेत्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावणे हे अत्यंत दुर्दैवी असून या चुकीची पुनरावृत्ती सदर नेतेमंडळींनी भविष्यात करू नये ही माझी विनंती आहे, असे परखड मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे धडाडीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केले.
कर्नाटकातील भाजप सरकारतर्फे येळ्ळूर राजहंस गडावरील छ. शिवाजी महाराजांच्या अनावरण करण्यात आलेले असताना बेळगाव ग्रामीण आमदारांच्या पुढाकाराने काल रविवारी पुन्हा त्या मूर्तीचा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. सीमाप्रश्न आणि कर्नाटक सरकारकडून बेळगाव सीमाभागातील मराठी भाषिकांवर केला जाणारा अन्याय अत्याचार लक्षात घेता महाराष्ट्रातील नेतेमंडळी या कार्यक्रमाला हजेरी लावणे अपेक्षित नसताना संबंधित सर्व नेते कार्यक्रमाला हजर होते. या पार्श्वभूमीवर रमाकांत कोंडुसकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते. येळ्ळूर राजहंस गडावरील शिव पुतळ्याचे दुसऱ्यांदा अनावरण म्हणजे पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज आणि परमपूज्य भगव्या ध्वजाचा पर्यायाने संपूर्ण हिंदुस्थानचा अवमान आहे. त्या कार्यक्रमाला कोल्हापूरचे छ. संभाजीराजे भोसले, आमदार बंटी पाटील, आमदार धीरज देशमुख वगैरे महाराष्ट्रातील नेते हजर होते. सीमा भागातील मराठी नेते मंडळींनी सदर कार्यक्रमाला हजर राहू नये असे आवाहन केलेले असताना ते झुगारून त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. हा येथील समस्त मराठी भाषिकांसह शिवभक्तांचा अवमान असल्यामुळे मी त्या सर्व नेत्यांचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरणास आमचा विरोध नाही.
मात्र स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी शिवरायांचा अवमान केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी बेळगावात आयोजित गुरुवंदना कार्यक्रमासाठी कोल्हापूरच्या छ. संभाजी राजांना निमंत्रित केले होते त्यावेळी कार्यक्रमाला हजर राहण्याचे आश्वासन देऊन ऐनवेळी ते कार्यक्रमाला आले नाहीत हा देखील त्यांनी केलेला बेळगावातील मराठी भाषिकांचा एक प्रकारे अपमान म्हणावा लागेल. पतंग महोत्सव वगैरे कार्यक्रमासाठी वेळ देणाऱ्या छ. संभाजी राजांनी खरंतर शिवरायांचे वंशज या नात्याने दोन दोनदा शिव पुतळ्याचे अनावरण का? असा सवाल करायला हवा होता. सर्व शिवभक्त आणि सर्व पक्षियांनी संघटितपणे महाराजांच्या मूर्तीचे अनावरण केले पाहिजे होते असे त्यांनी सुनावले पाहिजे होते. मात्र दुर्दैवाने तसे घडले नाही.
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना झाली. त्यावेळी आम्ही विटंबना करणाऱ्यांना अटक व्हावी यासाठी धर्मवीर संभाजी चौकात शंभूराजांच्या मूर्ती समोर आंदोलन केले. तेंव्हा माझ्यासह 53 जणांवर गुन्हे नोंदवून आम्हाला 47 दिवस कारागृहात डांबण्यात आले. त्यावेळी आत्ता जे छ. शिवाजी महाराजांचा उदो उदो करत आहेत, भगवा ध्वज हातात घेऊन मिरवत आहेत, हे सर्वजण कोठे होते? त्यावेळी या सर्व नेत्यांच्या तोंडातून शिवरायांच्या विटंबनेबद्दल एक चकार शब्द देखील बाहेर पडला नाही. त्यामुळे सध्याचा प्रकार म्हणजे छत्रपतींच्या नावावर निव्वळ स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रकार आहे.
महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे नेते हे सीमावासीय मराठी भाषिकांसाठी मायबाप आहेत असे असताना कोल्हापूरच्या महाराजांसह संबंधित नेत्यांनी राजहंसगडावरील कार्यक्रमास हजेरी लावून बेळगावच्या शिवभक्त आणि समस्त सीमावासीय मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. किमान यापुढे तरी त्यांनी बेळगावसह सीमा भागातील कार्यक्रमांना विचारपूर्वक हजेरी लावावी. त्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांशी संपर्क साधून चर्चा करावी. कर्नाटकातील भाजप, काँग्रेस वगैरे राजकीय पक्षांच्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना आडकाठी केली जात नाही.
मात्र तेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव सीमाभागात येण्यास बंदी घातली जाते असे सांगून मराठी भाषिकांना या पद्धतीने कर्नाटक सीमाभागात जी दुय्यम वागणूक दिली जाते याचा महाराष्ट्रातील नेत्यांनी गांभीर्याने विचार करावा. राजहंस गडावरील कार्यक्रमाला हजर राहून केलेल्या चुकीची पुनरावृत्ती त्यांनी भविष्यात पुन्हा करू नये हीच नम्र विनंती, असे रमाकांत कोंडुसकर शेवटी म्हणाले