बेळगाव लाईव्ह : जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतशा राजकीय घडामोडी वाढत आहेत. राज्याच्या राजकारणातील महत्वाचे व्यक्तिमत्व मानले जाणारे माजी मंत्री आणि गोकाक मतदार संघाचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी आता नवा गौप्यस्फोट केला असून महेश कुमठळ्ळी यांना अथणी मतदार संघातून भाजपने उमेदवारी न दिल्यास आपण गोकाकमधून निवडणूक लढविणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
विजापूर येथे भाजपच्या विजय संकल्प यात्रेत सहभागी झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी मतदार संघासाठी भाजपच्या उमेदवारीसंदर्भात बोलताना त्यांनी अथणी मतदार संघातून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी देण्यासंदर्भात अप्रत्यक्षपणे मागणी केली.
यावेळी येळ्ळूर राजहंसगडावरील शिवमूर्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, याबाबत काँग्रेस नेत्यांना विचारण्यात यावे, आपण केवळ सरकारी शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम आयोजित केला आणि कायदेशीर कार्यक्रम पार पाडला, असे सांगत प्रसारमाध्यमांना राजहंसगडप्रकरणी जारकीहोळी यांनी उत्तर देणे कटाक्षाने टाळले.
आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यात अधिकाधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार असून सध्या असलेल्या भाजपच्या तेरा जागांव्यतिरिक्त अधिक जागांवर विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.