Monday, April 29, 2024

/

शिव दुग्धाभिषेक सोहळा म्हणजे विरोधकांना चपराक -कोंडुसकर

 belgaum

आपल्या स्वार्थासाठी आणि मतांसाठी छ. शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करणाऱ्या राजकीय पक्ष आणि नेत्यांनी शिवरायांचा पुतळा आणि शिवसृष्टीचे दोन दोनदा उद्घाटन करून लोकांना आकर्षित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. मात्र तेच म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली आमच्या सर्व शिवभक्तांनी स्वयं प्रेरणेने, स्वखर्चाने भर उन्हात शिव दुग्धाभिषेक सोहळ्यासाठी 25 हजार शिवप्रेमी आणि माता-भगिनींना एकत्रित आणण्याचा पराक्रम करत या सोहळ्याला विरोध करणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते रमाकांत कोंडुसकर यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज सोमवारी येळ्ळूर राजहंसगडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याप्रसंगी कोंडुसकर बेळगाव लाईव्हशी बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने काल रविवारी राजहंस गडावरील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा दुग्धाभिषेक व जलाभिषेक सोहळा भव्य प्रमाणात पार पडला. सदर सोहळ्यास बेळगाव शहर, तालुका आणि जिल्ह्यातील हजारो शिवप्रेमी आणि माता-भगिनी उपस्थित होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमा झाल्यामुळे गड परिसरात कचरा निर्माण झाला होता. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी आज सकाळी गडावर स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत गडाच्या माथ्यावरील शिवरायांच्या मूर्ती समोरील परिसर, त्याचप्रमाणे गडावर जाणारा रस्ता आणि गडाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी काल महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती तो परिसर साफसफाई करून स्वच्छ केला गेला. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणयेकर, नेते रमाकांत कोंडुसकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आदींच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य समिती कार्यकर्त्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग दर्शविला होता.

यावेळी शिव दुग्धाभिषेक सोहळ्याबद्दल बोलताना कोंडुसकर यांनी सर्वप्रथम कालचा सोहळा भव्य प्रमाणात अपूर्व उत्साहाने मात्र शांततेत पार पाडल्याबद्दल समस्त शिवभक्त, समितीचे नेते, कार्यकर्ते, मराठी भाषिक आणि सर्व माता-भगिनींचे आभार मानले. अलीकडे छ. शिवाजी महाराजांचा पदोपदी अवमान होत आहे. याचे उदाहरण म्हणजे राजहंस गडावरील त्यांची मूर्ती असो किंवा शिवसृष्टी असो यांचे दोन-तीन वेळा घिसाळ घाईने उद्घाटन करण्यात आले. हे सर्व निव्वळ राजकीय स्वार्थासाठी होते. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी भाषिक आणि बहुजन समाजाची मते आपल्याकडे आकर्षित करून घेण्याच्या उद्देशाने हे उद्घाटनाचे कार्यक्रम केले गेले. कुकर, साड्या, भांडी वगैरे साहित्य असं पैशाचे वाटप करण्यात आले कार्यकर्त्यांना त्यांच्या वाहनांसाठी पेट्रोल खर्च देण्याबरोबरच वैयक्तिक पैसे देण्यात आले आपण आयोजित केलेल्या उद्घाटन सोहळ्याला लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे हा त्यामागचा राजकीय नेत्यांचा हेतू होता. या उलट महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत समस्त शिवभक्त बहुजन समाज आणि मराठी भाषिकांनी सुमारे 25 हजाराच्या संख्येत हजर राहून कालच्या सोहळ्याला उदंड प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद देऊन सोहळा यशस्वी करण्यामागचा या सर्वांचा मूळ उद्देश प्रशासन व सरकार विरुद्धची चीड व्यक्त करणे हा होता असे रमाकांत कोंडुसकर यांनी सांगितले.Ramakant

 belgaum

राजहंसगडावरील दुग्धाभिषेक सोहळा होऊ नये यासाठी अडकाठी आणण्याचा प्रयत्न झाला. त्या संदर्भात बोलताना कालचा सोहळा भव्य प्रमाणात साजरा झाला या सोहळ्यासाठी गडावर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात येणार होती. त्याचवेळी प्रशासनाला हाताशी धरून कांही राजकीय संधी साधू मंडळी हा सोहळा कशाप्रकारे अयशस्वी होईल यासाठी प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून गडाच्या ठिकाणी एक फलक उभारला. या फलकाद्वारे गडावर पूजाअर्चा करण्यास बंदी आहे. कोणताही कार्यक्रम गडावर करता येणार नाही, अशा प्रकारची जाहीर सूचना करण्यात आली होती. तेंव्हा प्रशासनाचा मान राखून तसेच विद्युत रोषणाईसाठी गडावर मोठ्या प्रमाणात सामग्री न्यावी लागणार असल्यामुळे आम्ही विद्युत रोषणाची योजना रद्द केली अशी माहिती कोंडुस्कर यांनी दिली.

राजहंस गडावरील शिवछत्रपतींच्या मूर्ती अभिषेकानंतर आता शिवसृष्टीचेही पूजन होणार काय? या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेतेमंडळी जो काय निर्णय घेतील त्यानुसार पुढील वाटचाल केली जाईल असे त्यांनी सांगितले. आपण पाहिले असेल की राजकीय पक्ष कोणतीही शासकीय परवानगी न घेता तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करून कार्यक्रम घेत आहेत. त्यांच्या कार्यक्रमांमुळे शहरातील वाहतूक दोन-तीन दिवस विस्कळीत होत असते. या उलट आमच्या सोहळ्यास प्रशासनाकडून आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र आमच्या सर्व शिवभक्तांनी स्वयंप्रेरणेने आणि स्वखर्चाने भर उन्हात कालच्या सोहळ्याला 25 हजार शिवप्रेमी आणि माता -भगिनींना एका छताखाली आणण्याचा पराक्रम करून दाखवला. हा पराक्रम म्हणजे सोहळ्याला विरोध करणाऱ्यांना दिलेली चांगली चपराक आहे, असेही रमाकांत कोंडुसकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.