जनतेकडून विरोध होणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आमदारांना तिकीट न देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे गुजरात पॅटर्ननुसार भाजपच्या विद्यमान 15 आमदारांना तिकिटापासून वंचित राहावे लागण्याची दाट शक्यता असून यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील आमदार देखील असणार का? याबद्दल चर्चा रंगू लागली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक रणनीतीकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल सोमवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत तिकीट न देण्यात येणाऱ्या नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांना चर्चा करण्यासाठी सूचना करण्यात आली असल्याचे समजते.
दिल्ली येथील खाजगी संस्थेकडून पाच वेळा कर्नाटकात सर्वेक्षण करण्यात आले आहे. ज्या मतदार संघात सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष आहे तेथील विद्यमान आमदाराला पराभवाला सामोरे जावे लागू शकते, असा अहवाल सर्वेक्षण संस्थेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे त्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांना तिकीट देण्याऐवजी नवीन चेहऱ्याला तिकीट देण्यात येणार आहे. यामध्ये आरएसएस संघ परिवाराची पार्श्वभूमी असणाऱ्या युवा चेहरांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात गुजरातच्या धर्तीवर तिकीट देण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत ज्येष्ठांना वगळून युवकांना संधी देण्यात आली होती आणि हा निर्णय यशस्वी ठरला होता. गुजरात पॅटर्न अनुसार आता राज्यातील विद्यमान 15 आमदारांची तिकिटे कट होण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे उमेदवारी नाकारली जाणाऱ्या विद्यमान आमदारांच्या यादीत बेळगाव जिल्ह्यामधील कोणत्या आमदाराची वर्णी लागणार? याबाबत सध्या चर्चा रंगू लागली आहे. अनेकांनी आकडेवारीचे खेळ मांडले आहेत. त्यामध्ये भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? कोणत्या मतदारसंघात कोण विजयी होणार? याबाबतचे अंदाज वर्तविले जात आहेत.