राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असून मराठी भाषिकांना संघटित करण्याचा आमचा हेतू सफल झाला आहे. आता काल घेतलेली शपथ सर्वांनी पाळणे अत्यावश्यक आहे. कार्यकर्ते ती पाळतीलच परंतु प्रामुख्याने समितीच्या नेते मंडळींनी ती शपथ पाळली पाहिजे अन्यथा गद्दारांना माफ केले जाणार नाही, असे परखड मत मध्यवर्तीय तसेच बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज सोमवारी सकाळी राजहंसगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याप्रसंगी ते बेळगाव लाईव्हशी बोलत होते. माजी आमदार किणयेकर म्हणाले की, कालचा सोहळा आमच्या अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. सदर सोहळ्याला दहा-बारा हजार लोक उपस्थित राहतील असे वाटत होते, मात्र प्रत्यक्षात जवळपास 20 हजार लोक जमा झाले होते. यावरून लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात समिती विषयी अजूनही प्रेम आहे हे दिसून येते. तेंव्हा आता आम्ही नेते मंडळींनी व्यवस्थित वागले पाहिजे हे यावरून लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे स्वाभिमान गहाण टाकणार नाही, गद्दारी करणार नाही, समितीच्या ध्येय धोरणाशी प्रामाणिक राहीन या आशयाची काल घेतलेली शपथ सर्वांनी पाळली पाहिजे. तसे झाल्यास बेळगावमधील तीनही मतदार संघात समिती उमेदवारांचा विजय होणे कठीण नाही. कार्यकर्ते शपथ पाळतीलच, मात्र ही शपथ प्रामुख्याने नेते मंडळींनी पाळली पाहिजे. आपले श्रद्धास्थान असलेल्या शिवरायांची तत्त्व, आचार -विचार आपण सर्वांनी आचरणात आणणे आज गरजेचे आहे. कालच्या सोहळ्याचा हा जो उद्देश होता तो नक्कीच सफल झाला आहे असे मला वाटते. तेंव्हा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुकांनी तसे वागावे. जनतेसमोर जाताना आपण प्रामाणिक आहोत हे त्यांना सिद्ध करता आले पाहिजे.
कालच आम्ही एक निर्णय घेण्याचे ठरविले आहे, तो निर्णय म्हणजे महाराष्ट्र एकीकरण समितीची ‘गद्दार विरोधी सेना’ स्थापन करणे हा आहे. याची घोषणा आगामी बैठकीत केली जाईल. बेळगाव शहर आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांची संयुक्त अशी ही गद्दार विरोधी सेना असणार आहे. ही सेना समितीमधील गद्दारांच्या विरोधात सतत कार्यरत राहील. जो कोणी गद्दारी करेल त्याला या सेनेद्वारे घराबाहेर पडू दिले जाणार नाही. स्वराज्यात गद्दारांवर बहिष्कार टाकला जात होता. तशी कठोर कृती करण्याची वेळ आता आली आहे, असे किणेकर यांनी सांगितले.
दुग्धाभिषेक सोहळ्यानंतर शिवसृष्टी पूजन कार्यक्रमासंदर्भात बोलताना आपण आपली ताकद विचारपूर्वक वापरली पाहिजे, विरोधकांना अनाठाई महत्त्व दिले जाऊ नये. आपले आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भाजप आणि काँग्रेसकडून उद्घाटन करण्यात आले, ही शिवप्रेमी आणि मराठी भाषिकांच्या मनात जी सल होती ती दूर करण्यासाठी कालचा दुग्धाभिषेक सोहळा झाला. आता कार्यकर्त्यांसह सर्वांची अपेक्षा असेल तर शिवसृष्टी येथे देखील जलाभिषेक सोहळा केला जाईल. तथापि आता आचारसंहिता लागू होत आहे असे सांगून काही का असेना मराठी माणसांना संघटित करण्याचा आमचा जो उदात्त हेतू होता तो कालच्या सोहळ्याने यशस्वी झाला आहे. आता यापुढे प्रत्येक कार्यक्रमात मराठी भाषिकांची अशी संघटित शक्ती दिसेल ही अपेक्षा आहे आणि नेते मंडळी देखील यापासून बोध घेतील असे मला वाटते, असे माजी आमदार मनोहर किणयेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना युवा नेते मदन बामणे यांनी कालच्या शिवदुग्धाभिषेक सोहळ्याला जो जनसागर लोटला होता त्याद्वारे बेळगाव सीमा भागावर अद्याप महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व आहे हे आम्ही दाखवून दिले आहे असे सांगितले.
गद्दार विरोधी सेनेच्या स्थापनेला पाठिंबा दर्शवताना महाराष्ट्र एकीकरण समिती मधील घाण काढून टाकणे, गद्दारीला वेळीच आळा घालणे, ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी स्वच्छता मोहिमेत रमाकांत कोंडूस्कर आर एम चौगुले,आर आय पाटील,शिवाजी सुंठकर,मदन बामणे,दत्ता उघाडे अमर येळळूरकर,विकास कलघटगी ,गणेश ओऊळकर आदींनी सहभाग घेतला होता.